अनिरुद्ध आणि काव्या मारन यांचा विवाह; लग्नासाठी सेलिब्रिटी ग्रीसची निवड करण्यामागे 'ही' आहेत कारणं

फोटो स्रोत, Anirudh Ravichander
संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सन टीव्ही नेटवर्कच्या कार्यकारी संचालक काव्या मारन यांचा विवाह सोहळा पार पडला.
10 आणि 11 नोव्हेंबर असा दोन दिवस हा विवाह सोहळा पार पडला असून, या लग्नाला हजेरी लावण्यासाठी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, अभिनेते रजनीकांत आणि दोन्ही कुटुंबांचे जवळचे नातेवाईक ग्रीसला गेल्याच्या बातम्या माध्यमांत आल्या आहेत.
'डेस्टिनेशन वेडिंग'साठी सेलिब्रिटींनी ग्रीसची निवड करणं हे काही नवीन नाही. सेलिब्रिटींचं सर्वात आवडतं 'वेडिंग डेस्टिनेशन' म्हणून ग्रीस ओळखलं जाण्यामागे अनेक गोष्टी कारणीभूत आहेत.
युरोपातील ग्रीस हा देश आपल्या निसर्गसौंदर्यासाठी आणि प्राचीन इतिहासासाठी ओळखला जातो.
ग्रीसमध्ये हजारो बेटे आहेत, ज्यात 'क्रीट' (Crete) हे सर्वात मोठे बेट आहे. एजियन समुद्रात वसलेली अशी अनेक बेटे ग्रीसची मुख्य ओळख मानली जातात असं या देशाच्या पर्यटन विभागाच्या वेबसाइटवर म्हटलं आहे.
उंचच उंच पर्वत, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि निळाशार समुद्र अशा विलोभनीय निसर्गसौंदर्याने नटलेला हा देश आहे.
यामुळेच 'डेस्टिनेशन वेडिंग' करण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे जात असतात.
ग्रीसमधील पाश्चात्त्य साहित्य, कला, तत्त्वज्ञान आणि राजकारणावर प्राचीन ग्रीक संस्कृतीचा मोठा प्रभाव आहे आणि राजधानी अथेन्ससह ग्रीसमधील प्रमुख शहरांमध्ये आढळणारी ऐतिहासिक स्मारके याची साक्ष देतात, असं 'ओपनस्टॅक्स'ने म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दुसऱ्या महायुद्धानंतर ग्रीसमध्ये आर्थिक आणि सामाजिक बदल झपाट्याने घडून आले. पर्यटन आणि सागरी मालवाहतूक या क्षेत्रांनी या देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावण्यास सुरुवात केली.
ग्रीसच्या एखाद्या बेटावर जाऊन लग्न करण्याचं स्वप्न अनेक प्रेमी युगुलांचं असतं. यामागे 'माम्मा मिया' सारख्या चित्रपटांचाही मोठा वाटा आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण जिथे झालं, त्या ग्रीसमधील 'स्कोपेलोस' बेटाला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी प्रसिद्धी आणि ओळख मिळाली आहे.
परदेशी जोडप्यांच्या 'डेस्टिनेशन वेडिंग'च्या यादीत ग्रीसमधील सँटोरिनी बेटाला मोठी पसंती आहे.
फक्त 2018 च्या उन्हाळ्यात एक हजारांहून अधिक परदेशी जोडप्यांनी सँटोरिनी बेटावर लग्नगाठ बांधल्याची बातमी 'द गार्डियन'ने दिली आहे.
इथे केवळ नवीन लग्नं होत नाहीत, तर आधी लग्न झालेली जोडपीसुद्धा वैवाहिक जीवनाच्या शपथांना पुन्हा उजाळा देण्यासाठी ते पुन्हा एकदा घेण्यासाठी सँटोरिनीला येतात.
केशरी रंगात न्हाऊन निघणारा सूर्यास्त, पांढरीशुभ्र घरे आणि ज्वालामुखीच्या उद्रेकातून तयार झालेली समुद्राच्या पाण्याने भरलेली दरी या गोष्टी जोडप्यांना इथे आकर्षित करतात.
समुद्राचे विहंगम दृश्य दिसणारे रिसॉर्ट्स, खाजगी पार्टीचे नियोजन आणि लग्न समारंभांसाठी असलेल्या खास सुविधांमुळे या बेटाची भुरळ आणखी वाढली आहे.
ग्रीसच्या अधिकृत पर्यटन वेबसाइटवरही सँटोरिनी हे परदेशी जोडप्यांचे आवडते 'वेडिंग आणि हनिमून डेस्टिनेशन' असल्याचं म्हटलं आहे.
![[Photo कॅप्शन: सँटोरिनी बेट. ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/4cb6/live/bb038f70-df4b-11f1-93e1-3b657b665bcf.jpg.webp)
फोटो स्रोत, Anirudh Ravichander
घरचे लोक आणि अगदी जवळचे मित्रमंडळी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या छोटेखानी लग्न समारंभांसाठी ग्रीसची बेटे उत्तम ठिकाण ठरत आहेत.
जास्तीत जास्त 20 जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या मोजक्या आणि घरगुती स्वरूपाच्या लग्नांना आता जोडप्यांचा कल वाढत आहे.
त्यामुळेच ग्रीसच्या मायकोनोस आणि पाफोससारख्या पार्ट्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेटांपेक्षा अमोर्गोस आणि केफालोनियासारख्या शांत, निसर्गरम्य बेटांना जास्त मागणी आहे, असं बीबीसीने आपल्या बातमीत म्हटलं आहे.
पण परदेशात जाऊन लग्न करणं इतकं सोपं नाही. ज्या देशात लग्न करायचं आहे, तिथले कायदेशीर नियम, लागणारी कागदपत्रं, हवामान, राहण्याची सोय, कार्यक्रमाची व्यवस्था आणि खर्च अशा अनेक गोष्टींचं आधीच नियोजन करावं लागतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























