तोंडात 'रसगुल्ला' फुटला अन् तरुणाचा जीव गेला; घटनेनंतर पोलिसांनी दिली ही माहिती

तोंडात रसगुल्ला फुटला अन् तरुणाचा जीव गेला; मध्य प्रदेशातील नेमकं प्रकरण काय?
    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसीसाठी, भोपाळमधून
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

(या वृत्तातील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतो.)

मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात एका 35 वर्षीय व्यक्तीचा रसगुल्ला खाल्ल्यानंतर मृत्यू झाला. राजेंद्र बरौतिया असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून त्यांना त्यांच्या मित्राने हा रसगुल्ला खायला दिला होता.

रसगुल्ला खाताच त्यांच्या तोंडात मोठा स्फोट झाला. त्यानंतर लगेचच त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र यांचे शेजारी राहणारे मित्र रामभगत सिंह बरौतिया यांनी त्यांना रसगुल्ला असल्याचे सांगून डुकरांना मारण्यासाठी वापरला जाणारा गावठी बॉम्ब खायला दिला होता.

ही घटना मंगळवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळी दिंडोरीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पडरिया छांटा गावात घडली.

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. यात रसगुल्ल्यात बॉम्ब ठेवून तो राजेंद्रला देणारा रामभगत आणि जंगलात हा बॉम्ब सापडलेला आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे.

"दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे," असं दिंडोरी कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी दुर्गा प्रसाद नागपुरे यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं

नेमकं काय घडलं?

पोलीस ठाण्याचे प्रभारी दुर्गा प्रसाद नागपुरे यांनी सांगितलं की, घटनेच्या दिवशी सायंकाळी राजेंद्र बरौतिया आपल्या घराच्या अंगणात कुटुंबीयांसोबत शेकोटीजवळ बसला होता. त्यावेळी त्याची पत्नी, मुलगा आणि आजीही तिथे उपस्थित होती.

त्याचवेळी शेजारी राहणारा रामभगत सिंह तिथे आला. दोघेही शेकोटीजवळ बसून गप्पा मारू लागले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्यात थट्टामस्करीही झाली.

नागपुरे यांनी सांगितलं की, याचवेळी रामभगतने राजेंद्रला छोट्या चेंडूच्या आकाराची एक वस्तू दिली. ती रसगुल्ला असल्याचं सांगून त्याने राजेंद्रला खाऊन पाहण्यास सांगितलं.

Caption- राजेंद्रची पत्नी सुशीलाबाईच्या म्हणण्यानुसार, रामभगतने दिवाळीचा उल्लेख करत तिच्या पतीला रसगुल्ला खाण्यासाठी दिला. राजेंद्रने तो चावताच त्याच्या तोंडात तो फुटला.
फोटो कॅप्शन, राजेंद्रची पत्नी सुशीलाबाईच्या म्हणण्यानुसार, रामभगतने दिवाळीचा उल्लेख करत तिच्या पतीला रसगुल्ला खाण्यासाठी दिला. राजेंद्रने तो चावताच त्याच्या तोंडात तो फुटला.

राजेंद्रची पत्नी सुशीलाबाईने बीबीसी न्यूजला सांगितलं, "रामभगतने दिवाळीचा उल्लेख करत माझ्या पतीला रसगुल्ला खाण्यास सांगितलं. त्यांनी तो तोंडात टाकून चावताच अचानक स्फोट झाला."

सुशीला पुढे सांगते, "मला काहीच समजलं नाही. माझ्या पतीच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली होती. स्फोटामुळे त्यांचा चेहरा इतका बदलला होता की, एका क्षणात त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं."

यानंतर कुटुंबीयांनी राजेंद्रला रिक्षामधून डिंडोरी जिल्हा रुग्णालयात नेलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

राजेंद्रची पत्नी सुशीलाबाई यांनी सांगितलं की, तिच्या पतीनं जनावरांना मारण्यासाठी वापरला जाणारा बॉम्ब खाल्ला होता.

राजेंद्रच्या मृत्यूनंतर कुटुंबात पत्नी सुशीला आणि त्यांचं एक मूल आहे.

कुठून आणला होता बॉम्ब?

पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला हा स्फोटक पदार्थ जंगलामध्ये सापडला होता.

जंगलामध्ये हा बॉम्ब सापडलेल्या व्यक्तीने तो रामभगत सिंहला दिला होता. त्यानंतर रामभगतने तो रसगुल्ला असल्याचं सांगून राजेंद्रला खायला दिला.

हा बॉम्ब जंगलात कुठून आला आणि तो तिथे कोणी ठेवला होता, याचा आता पोलीस तपास करत आहेत.

Caption- पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोघांमध्ये कोणतंही जुनं वैर असल्याचं समोर आलेलं नाही.
फोटो कॅप्शन, Caption- पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात दोघांमध्ये कोणतंही जुनं वैर असल्याचं समोर आलेलं नाही.

प्राथमिक तपासात अटक केलेल्या दोघे आणि राजेंद्र यांच्यात कोणतंही पूर्ववैमनस्य असल्याचं समोर आलेलं नाही.

पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 105 आणि स्फोटक पदार्थ कायद्यातील कलम 3 आणि 4 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हा बॉम्ब किती धोकादायक आहे?

मध्य भारतातील अनेक गावांमध्ये डुकरांना मारण्यासाठी अशा बॉम्बचा वापर केला जातो. त्यांना 'पिग बॉम्ब' किंवा 'डुक्कर मारण्याचा बॉम्ब' असंही म्हणतात.

असे गावठी बॉम्ब खाण्याच्या पदार्थांत मिसळून ते जंगलात ठेवले जातात. डुक्कर किंवा इतर छोटे प्राणी ते खाण्यासाठी चावतात, तेव्हा त्यांच्या तोंडात त्याचा स्फोट होतो आणि त्यांचा मृत्यू होतो.

इंदूर येथे राहणारे स्फोटक तज्ज्ञ शरद सरवटे यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, अशा बॉम्बचा परिणाम त्यात कोणते रासायनिक पदार्थ वापरले आहेत, यावर अवलंबून असतो. अशा बॉम्बमध्ये वापरलेले काही पदार्थ दाब पडल्यावर किंवा दबावामुळे फुटतात.

Caption- रुग्णालयाबाहेर उपस्थित असलेले राजेंद्रचे नातेवाईक.
फोटो कॅप्शन, रुग्णालयाबाहेर उपस्थित असलेले राजेंद्रचे नातेवाईक.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सरवटे यांच्या म्हणण्यानुसार, "काही स्फोटक पदार्थांमध्ये अमोनियम नायट्रेट आणि नायट्रेट जेलीसारखे पदार्थ मिसळलेले असतात. त्यांना दाबल्यास वेगाने वायू तयार होतो. त्यामुळे आत दाब वाढतो आणि स्फोट होतो."

त्यांनी सांगितलं की, अशा स्फोटकांचं मिश्रण जेल किंवा टूथपेस्टसारखं असतं. त्यांचा आकार दिवाळीत वापरल्या जाणाऱ्या सुतळी बॉम्बइतका असतो.

सरवटे यांनी सांगितलं की, "जिथे कमी तीव्रतेचा स्फोट घडवायचा असतो, तिथे अशा स्फोटकांचा वापर केला जातो. डुकरांसारख्या प्राण्यांना मारण्यासाठी कमी तीव्रतेचा स्फोट पुरेसा असतो.

त्यामुळे त्यांच्या शरीराचा इतर भाग वापरण्यायोग्य राहतो. हा बॉम्ब चावला किंवा त्यावर दाब पडला की त्याचा स्फोट होतो आणि शरीराच्या संबंधित भागाला गंभीर दुखापत होते."

दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळावरून स्फोटकाचे अवशेष आणि इतर नमुने गोळा केले आहेत. पोलीस ठाण्याचे प्रभारी दुर्गा प्रसाद नागपुरे यांच्या माहितीनुसार, हे नमुने तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत (फॉरेन्सिक लॅब) पाठवले जाणार आहेत.

ते म्हणाले, "आतापर्यंतच्या तपासात अटक केलेल्या आरोपींचं आणि मृत राजेंद्रचं कोणतंही भांडण किंवा वैर असल्याचं समोर आलेलं नाही. बॉम्बमध्ये नेमके कोणते पदार्थ होते, हे तपासण्यासाठी तो पुढे पाठवण्यात येणार आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.