अमेरिकेत जवळपास 4 तास विमानसेवा ठप्प राहिल्यानंतर उड्डाणांवरील बंदी उठवली, जाणून घ्या काय घडलं

फ्लोरिडातील मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा थांबवल्यामुळे संतप्त झालेले प्रवासी.
फोटो कॅप्शन, फ्लोरिडातील मायामी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानसेवा थांबवल्यामुळे संतप्त झालेले प्रवासी.
थोडक्यात
  • फ्लाइटरडार24च्या माहितीनुसार, विमान उड्डाणांवर निर्बंध घालण्यात आले, त्यावेळी सुमारे 3,100 विमाने हवेत होती आणि अमेरिकेतील विमानतळांच्या दिशेने येत होती. मात्र, या काळात कोणत्याही अतिरिक्त विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नव्हती.
  • विमानातील प्रवाशांनी सांगितलं की, विमानतळावर उतरलेल्या विमानांनाही धावपट्टीवरून (रनवे) विमानाच्या पार्किंग गेटपर्यंत जाण्याची परवानगी दिली जात नव्हती.
  • अमेरिकेतील अनेक प्रमुख विमानतळांनी उड्डाणं स्थगित झाल्याची पुष्टी केली होती. तसेच, विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी प्रवाशांनी त्यांच्या विमान कंपनीशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला होता.
  • ही समस्या कोणत्याही सायबर हल्ल्यामुळे किंवा एआयमुळे निर्माण झाल्याचे दिसत नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

अमेरिकेत जवळपास 4 तास विमानसेवा ठप्प राहिल्यानंतर उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली असून विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे.

मात्र, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, विमान उड्डाणांवर घालण्यात आलेल्या या व्यापक निर्बंधांचा परिणाम पुढे आणखी काही दिवस जाणवू शकतो.

यापूर्वी अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रण (एअर ट्रॅफिक कंट्रोल) यंत्रणेच्या संपर्क प्रणालीत तांत्रिक बिघाड झाल्यामुळे देशभरातील विमानसेवा थांबवण्यात आली होती.

अमेरिकेतील राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे (नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड) माजी प्रमुख म्हणाले की, 11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर विमानसेवा स्थगित करण्याची घटना कधीही घडली नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत फॉक्स न्यूजशी बोलताना म्हटलं की, ही समस्या सायबर हल्ल्यामुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (एआय) निर्माण झाल्याचे दिसत नाही.

बीबीसीचे अमेरिकेतील मीडिया पार्टनर सीबीएस न्यूजशी बोलताना रॉबर्ट एल. सुमवाल्ट म्हणाले, "आजच्या आधुनिक काळातही असं घडू शकतं, ही आश्चर्याची बाब आहे."

अमेरिकेच्या गृहसुरक्षा मंत्री मार्कवेन मुलिन यांनी या घटनेतून अमेरिकेवर कोणताही हल्ला झाल्याचे सूचित होत नसल्याचं स्पष्ट केले. तसेच, सर्वजण सुरक्षित असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ईस्ट बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स विमानतळावरील एका फलकावर लिहिलं आहे की अनेक विमानांना विलंब होत आहे किंवा ती रद्द करण्यात आली आहेत.
फोटो कॅप्शन, ईस्ट बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स विमानतळावरील एका फलकावर लिहिलं आहे की अनेक विमानांना विलंब होत आहे किंवा ती रद्द करण्यात आली आहेत.

एअर कॅनडाने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडा आणि अमेरिका दरम्यानची सर्व विमान उड्डाणे शुक्रवार (14 नोव्हेंबर) संध्याकाळपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.

मार्कवेन मुलिन यांनी नागरिकांना आश्वस्त करताना वारंवार सांगितले की, ही घटना 'आणखी एक 9/11' सारखी नाही.

यापूर्वी अमेरिकेच्या विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी सुरक्षेचे कारण देत सर्व विमान उड्डाणे थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यांनी या परिस्थितीचं वर्णन 'असाधारण परिस्थिती' असं केलं होतं.

व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मार्कवेन मुलिन यांनी ही तांत्रिक समस्या मायक्रोसॉफ्टच्या यंत्रणेत 1 दिवस आधी निर्माण झालेल्या बिघाडाशी संबंधित असल्याचा दावा फेटाळून लावला.

मुलीन म्हणाले की, सर्वांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आणि विमानतळांवर अडकलेल्या प्रवाशांना मदत मिळावी यासाठी प्रशासन अभूतपूर्व वेगाने काम करत असल्याचं मुलिन यांनी सांगितलं.

ते पुढे म्हणाले की, सामान्य नागरिक कधीही धोक्यात नव्हते. त्यांच्या शब्दांत, "कोणाच्याही जीवाला कधीही धोका नव्हता."

यामागचं नेमकं कारण काय?

सीबीएसच्या वृत्तानुसार, नेटवर्क अपडेटमुळे संपर्क यंत्रणेत हा तांत्रिक बिघाड उद्भवला.

सीबीएसला अनेक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील विमान उड्डाणे थांबवण्यास कारणीभूत ठरलेला तांत्रिक बिघाड हा अमेरिकेच्या हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीला जोडणाऱ्या खासगी संपर्क नेटवर्कच्या अपडेटमुळे झाला होता.

सीबीएसच्या माहितीनुसार, एल3हॅरिस (L3Harris) ही कंपनी या नेटवर्कचे संचालन करते. नेटवर्क अपडेट केल्यानंतर ते रीबूट झाले आणि त्यानंतर क्रॅश झाले.

फ्लोरिडामधील ऑर्लॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षेत असलेले लोक
फोटो कॅप्शन, फ्लोरिडामधील ऑर्लॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रतीक्षेत असलेले लोक

एल3हॅरिस कंपनी आपल्या वेबसाइटवर जगातील अत्याधुनिक हवाई क्षेत्र, शस्त्र प्रणाली तसेच कमांड अँड कंट्रोल प्लॅटफॉर्मसाठी संपर्क यंत्रणा उपलब्ध करून देणारी आघाडीची कंपनी असल्याचं सांगते.

बीबीसीने या प्रकरणी प्रतिक्रिया मागितली असता एल3हॅरिसने तातडीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, ऑस्ट्रेलियातून बीबीसीच्या वार्ताहर सिमोन अ‍ॅटकिन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडनी येथील देशातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने अमेरिकेला जाणारी सर्व विमान उड्डाणे तात्पुरती थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

2023 मध्येही देशभरातील विमानसेवेवर झाला होता परिणाम

बीबीसी व्हेरिफायचे जॅक हॉर्टन यांच्या मते, अमेरिकेतील विमान उड्डाणांवरील निर्बंधांची तुलना यापूर्वी घडलेल्या घटनांशी केली जात आहे.

देशभरातील विमान उड्डाणे थांबवण्याबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत अमेरिकेचे गृहसुरक्षा मंत्री मार्कवेन मुलिन यांनी ही घटना 9/11 सारखी नसल्याचं वारंवार स्पष्ट केलं.

बीबीसी व्हेरिफायने क्रॅनफिल्ड विद्यापीठातील एव्हिएशन अँड एन्व्हायर्नमेंट विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. गाय ग्रॅटन यांच्याशी याबाबत चर्चा केली.

ते म्हणाले, "9/11 नंतरची ही सर्वात गंभीर घटना वाटत असली, तरी तिची तुलना त्या हल्ल्याच्या गांभीर्याशी निश्चितच करता येणार नाही."

डोनाल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळावरील लाउंजमध्ये वाट पाहत तात्कळलेले प्रवासी.
फोटो कॅप्शन, डोनाल्ड रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळावरील लाउंजमध्ये वाट पाहत तात्कळलेले प्रवासी.

यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांबाबत विचारले असता डॉ. ग्रॅटन यांनी 2023 मध्ये अमेरिकेत घडलेल्या एका घटनेचा उल्लेख केला. त्यावेळी नोटीस टू एअर मिशन्स (NOTAM) या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विमान उड्डाणे थांबवावी लागली होती.

ते म्हणाले, "ती परिस्थिती 1 तास 52 मिनिटे कायम होती. या काळात जवळपास 9,500 विमान उड्डाणांना विलंब झाला, तर सुमारे 1,300 उड्डाणे रद्द करावी लागली होती."

या यंत्रणेतील बिघाडामुळे हवाई वाहतुकीशी संबंधित सुरक्षाविषयक सूचना जारी करणं शक्य झालं नव्हतं. ही यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होईपर्यंत विमान उड्डाणांवरील निर्बंध कायम ठेवण्यात आले होते.

एअर इंडियाने अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांना काय सल्ला दिला?

अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रणाच्या (एअर ट्रॅफिक कंट्रोल) संपर्क यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियानंही आपल्या प्रवाशांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

एअरलाइनने 'एक्स'वरील पोस्टद्वारे सांगितलं की, या तांत्रिक बिघाडाचा परिणाम अमेरिकेतील विविध विमानतळांवरून उड्डाण करणाऱ्या विमानांवर होत आहे.

अमेरिकेतील हवाई वाहतूक नियंत्रणाच्या संपर्क यंत्रणेत समस्या निर्माण झाल्यामुळे देशभरातील विमान उड्डाणे थांबवण्यात आली होती.

एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे (फाइल फोटो).
फोटो कॅप्शन, एअर इंडियाने प्रवाशांना विमानतळावर जाण्यापूर्वी त्यांच्या फ्लाइटची स्थिती तपासण्याचा सल्ला दिला आहे (फाइल फोटो).

एअर इंडियाच्या म्हणण्यानुसार, या बिघाडाचा परिणाम अमेरिकेला जाणाऱ्या आणि अमेरिकेतून येणाऱ्या त्यांच्या विमानसेवेवरही होऊ शकतो.

त्यामुळे प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या विमानाच्या उड्डाणाची सद्यस्थिती (करंट स्टेटस) तपासून घ्यावी, असा सल्ला एअरलाइनने दिला आहे.

एअर इंडियाच्या टीम परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तसेच, पुढील माहिती उपलब्ध होताच प्रवाशांना त्याबाबत कळवण्यात येईल, असेही एअरलाइनने स्पष्ट केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)