पाकिस्तानच्या कराचीतील रस्त्यांवरून हिंदू नावं गायब कशी झाली?

फोटो स्रोत, Farzan Rasheed
- Author, रशीद शकूर
- Role, बीबीसी न्यूज हिंदीसाठी
- Reporting from, कराचीहून
- Published
- वाचन वेळ: 12 मिनिटे
मला समजायला लागल्यापासून कराची हे नेहमीच एक गजबजलेलं शहर दिसलं. तिथल्या गोंगाटातही एकप्रकारची शिस्त होती आणि एक वेगळीच शांततेची भावना जाणवत असत.
वेगवेगळ्या समाजांचे आणि धर्मांचे असूनही लोकांमध्ये माणुसकी होती. एकमेकांचे दुःख समजून घेण्याची आणि अडचणीच्या वेळी मदत करण्याची त्यांची भावना असायची.
दुर्दैवाने, आज वयाच्या 65व्या वर्षी मागे वळून जेव्हा मी या शहराकडे पाहतो, तेव्हा मला सगळीकडे गोंधळ आणि निराशा दिसते. लोकांमधील सहनशीलताही कमी झाली आहे.
योगायोग असा की, माझं बालपण आणि तारुण्य कराचीतील रणछोड लाईन आणि रामस्वामी या 2 जुन्या भागांमध्ये गेलं. आजही तो परिसर याच नावांनी ओळखला जातो.
इतकंच नाहीतर शहरातील अनेक रस्ते, गल्ल्या आणि भागांची जुनी नावं आजही जुन्या पिढीतील लोकांच्या आठवणीत आहेत. पाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी यापैकी अनेक ठिकाणांची नावं हिंदूंच्या नावावर ठेवण्यात आली होती.
परंतु, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर अनेक रस्त्यांची आणि ठिकाणांची हिंदू नावं बदलून त्यांना मुस्लीम नावं देण्यात आली.
हिंदू व्यापारी रणछोडदास यांच्या नावावरून 'रणछोड लाईन'
कराचीचा ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास समजून घेण्यासाठी इक्बाल ए रहमान मांडविया, गुल हसन कलमती, उस्मान दमोहवी आणि अख्तर बलोच यांनी उल्लेखनीय संशोधन केलं आहे.
इक्बाल ए रहमान मांडविया यांनी कराचीतील जुन्या रस्त्यांचा, भागांचा इतिहास आणि तिथल्या लोकांचं दैनंदिन जीवन अतिशय सुंदरपणे मांडलं आहे. त्यांचं लिखाण वाचताना आपण जणू त्याच काळात वावरत आहोत, असं वाटतं.
हा लेख लिहिताना अखेर मला रणछोड लाईन आणि रामस्वामी या परिसराला भेट देण्याची संधी मिळाली. याच परिसरात माझं बालपण आणि तारुण्य गेलं होतं. तिथे पोहोचताच मी जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो.
इक्बाल ए रहमान मांडविया सांगतात, "रणछोडदास नावाच्या एका कच्छी हिंदू व्यापाऱ्यामुळे या भागाला रणछोड लाईन हे नाव पडलं. त्यांनी या भागात 2 ठिकाणी प्रत्येकी एक खोली असलेली घरं बांधली होती. ही घरं त्यांच्या नावाने ओळखली जाऊ लागली आणि पुढे संपूर्ण परिसरच रणछोड लाईन या नावाने ओळखला जाऊ लागला."
काळ बदलला, तरी या दोन्ही भागांची गजबज काही कमी झालेली नाही. आजही तिथल्या बाजारपेठांमध्ये पूर्वीसारखीच गर्दी आणि वर्दळ दिसून येते.
परंतु, सरकारी यंत्रणांच्या अनास्थेमुळे इथले रस्ते आणि गल्ल्यांची अवस्था खराब झाली आहे. परिसरात स्वच्छतेचाही अभाव दिसून येतो.
या परिसरात पूर्वीही वेगवेगळ्या समाजांचे आणि धर्मांचे लोक राहत होते आणि आजही राहतात.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
गजबजलेली रणछोड लाईन आजूबाजूच्या हिंदू व्यक्तींच्या नावावरून ठेवण्यात आलेल्या वस्त्यांमुळेही ओळखली जाते. यामध्ये आजा माऊजी स्ट्रीट, हिरालाल स्ट्रीट, नारायणपुरा आणि हरदास स्ट्रीट यांचा समावेश आहे.
या परिसरातील काही ठिकाणं आता अस्तित्वात नाहीत. तरीही लोकांच्या आठवणीत ती आजही पूर्वीसारखीच आहेत. यात अल फारूक हॉटेल आणि लखपती हॉटेलचा समावेश आहे.
परंतु, 1899 मध्ये बांधलेला पूना भाई टॉवर आजही या परिसराची ओळख म्हणून उभा आहे.
इक्बाल ए रहमान मांडविया यांच्या मते, "पूना भाई कोण होते, याची ठोस माहिती उपलब्ध नाही. पण, त्यांचे नातू विनोद मूलजी रणछोड लाईनमध्ये राहत होते. फाळणीच्या वेळी ते भारतात निघून गेले होते."
अख्तर बलोच यांनी आपल्या 'कराची वाला' या पुस्तकात लिहिलं आहे, "राजस्थानातून आलेले सलावत समाजाचे अनेक लोक रणछोड लाईन परिसरात राहतात. भारताची फाळणी होण्यापूर्वीपासूनच या समाजाचे लोक इथे राहत होते."
"हा समाज इमारती बांधण्याच्या कामासाठी प्रसिद्ध आहे. बाबा मीर मोहम्मद बलोच आणि हाशिम गझदर यांनी या समाजाला वेगळी ओळख मिळवून दिली. रणछोड लाईनमधील मुख्य रस्ता पूना भाई टॉवरपासून सुरू होतो आणि 'होती मार्केट'जवळ संपतो."
'होती मार्केट' 1926 मध्ये बांधण्यात आले होते. मुस्लीम मारवाडी सलावत समाजातील हसन अली होती यांच्या नावावरून या मार्केटला हे नाव देण्यात आलं. ते कराची नगरपालिकेचे सदस्यही होते.
होती मार्केटला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता हे मार्केट ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
अख्तर बलोच यांच्या मते, "सरकारने रणछोड लाईनचं नाव बदलून गझदर आबाद केलं होतं. पण, हे नाव केवळ सरकारी कागदपत्रांपुरतंच मर्यादित राहिलं आहे."
"स्थानिक लोक आजही या परिसराला त्याच्या जुन्याच नावाने ओळखतात. मात्र, ज्या हाशिम गझदर यांच्या नावावरून या भागाचं नाव गझदर आबाद ठेवण्यात आलं, ते इंजिनिअर होते. त्या काळातील राजकीय आणि सामाजिक कामांमध्ये ते सक्रिय होते. त्यांनी या भागात लोकांच्या हितासाठी अनेक कामंही केली होती."
रामस्वामी हा देखील कराचीतील एक जुना भाग आहे.
याबाबत इक्बाल ए रहमान मांडविया सांगतात, "स्वामीनारायण संप्रदायाचे हिंदू या परिसरात राहू लागले. त्यामुळे आजही हा भाग रामस्वामी याच जुन्या नावाने ओळखला जातो."
"या परिसरातील एक महत्त्वाचं केंद्र म्हणजे तुलसीदास स्ट्रीट. गोस्वामी तुलसीदास यांच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आलं होतं."
तुलसीदास स्ट्रीटमध्ये राहणाऱ्या लोकांनी तिथे मोठ्या प्रमाणात झाडं लावली होती. त्यामुळे ही गल्ली 'झाडांची गल्ली' म्हणजेच 'झाडवाली गली' म्हणूनही ओळखली जायची. परंतु, आता या गल्लीची दुरावस्था झाली आहे.
ज्यूंचं प्रार्थनास्थळ
रामस्वामी परिसरात एक अशी इमारत होती, जिच्याबद्दल मला लहानपणापासूनच कुतूहल वाटायचं, उत्सुकता असायची. ती इमारत म्हणजे मॅगन शालोम सिनेगॉग.
हे ज्यू धर्मीयांचं प्रार्थनास्थळ होतं आणि माझ्या घरापासून अगदी जवळ होतं. परंतु, सर्वजण त्याला बनी इस्रायल मशीद या नावाने ओळखत असत. ही इमारत 1893 मध्ये बांधण्यात आली होती.
ही या भागातील सर्वात प्रसिद्ध इमारत होती. परंतु, तिच्याबद्दल एक गूढही कायम होतं.
लाकडी दरवाजा उघडला की, मी आत येणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या लोकांकडे पाहत राहायचो.
काही काळानंतर कराचीतील ज्यू कुटुंबं शहर सोडून इस्रायलला जाऊ लागली. त्यानंतर 1988 मध्ये हे प्रार्थनास्थळ पाडण्यात आलं आणि त्याजागी एक इमारत उभारण्यात आली. त्यावेळी पाकिस्तानात झिया-उल-हक यांची सत्ता होती.

फोटो स्रोत, Emanuel Matate
ज्यू व्यापारी इमॅन्युएल मतात यांच्या कराचीशी अनेक आठवणी जोडल्या आहेत. कारण त्यांचा जन्म याच शहरामध्ये झाला होता.
त्यांनी कराचीतील प्रसिद्ध बीव्हीएस शाळेत शिक्षण घेतलं होतं. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये झहीर अब्बास यांची शतकी खेळी आणि इम्रान खानने एकाच सामन्यात 8 विकेट्स घेतल्याचा शानदार खेळही त्यांनी पाहिला होता.
आता ते इस्रायलमध्ये राहतात.
इमॅन्युएल मतात यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं, "कराचीतील याच सिनेगॉगमध्ये 1953 साली माझ्या आईने महिलांच्या कपड्यांच्या कार्यक्रमात भाग घेतला होता आणि पहिलं बक्षीसही जिंकलं होतं."
"योगायोग पाहा, माझ्या आई-वडिलांचा विवाहही याच सिनेगॉगमध्ये झाला होता."

फोटो स्रोत, Emanuel Matate
पाकिस्तानचे माजी कसोटी क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज इक्बाल कासिम यांचं बालपणही राम स्वामी भागात गेलं.
इक्बाल कासिम यांनी बीबीसीला सांगितलं, "मी जुन्या शहरातील सिटी कोर्टजवळील तय्यब अली शाळेत शिकत होतो."
"मी रोज राम स्वामीतील लॉरेन्स रोडवरून ट्रामने शाळेत जायचो. नंतर या रस्त्याचं नाव बदलून निश्तर रोड करण्यात आलं."
राम स्वामीच्या गल्ल्यांमध्ये लहानपणी ते टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचे, हे दिवस इक्बाल कासिम यांना आजही चांगले आठवतात.
त्यांच्यासोबत क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये आयझॅक सोलोमन यांचाही समावेश होता. कराचीमध्ये प्रथम श्रेणीचं क्रिकेट खेळलेले ते एकमेव ज्यू क्रिकेटपटू आहेत. सध्या ते अमेरिकेमध्ये राहतात.
अख्तर बलोच यांनी आपल्या एका लेखात कराचीतील ज्यू लोकांच्या स्मशानभूमीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. पुढे हा लेख त्यांच्या पुस्तकातही समाविष्ट करण्यात आला.
ही स्मशानभूमी कराचीतील जुन्या मेवा शाह स्मशानभूमीच्या एका भागात आहे. तिथे जवळपास 500 कबरी आहेत.
या स्मशानभूमीची देखभाल करणारे बलोच कुटुंब सर्वसामान्य लोकांना आत जाऊ देत नाही.
गांधी गार्डन कुठे गेलं?
रणछोड लाईन आणि राम स्वामी भागात जवळपास 15 वर्षे राहिल्यानंतर मी जवळच्याच शू मार्केट परिसरात राहायला गेलो.
त्यानंतर, एक नाव पुढच्या 31 वर्षांपर्यंत माझ्याशी जोडलं गेलं. ते नाव होतं हिरानंद खेम सिंह रोड.
हाच माझ्या घराचा पत्ता होता. याच पत्त्यावर मला नेहमी कोणतं ना कोणतं पत्र किंवा पार्सल यायचं.
ते दिवस वेगळेच होते. पोस्टमन दारावर टकटक करायचा. त्याच्या हातून पत्र किंवा पार्सल घेताना एक वेगळाच आनंद व्हायचा.
हिरानंद खेम सिंह कोण होते, याबद्दल निश्चितपणे माहिती उपलब्ध नाही.
माझ्या घराजवळचं गांधी गार्डन हे असं ठिकाण होतं. त्याकडे लोकांचं सर्वाधिक लक्ष जायचं.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
गांधी गार्डन हे केवळ एक उद्यान नव्हतं, तर ते कराचीची ओळख बनलं होतं. शहरातील प्रत्येकाच्या मनात या नावाला विशेष स्थान होतं.
सुरुवातीला याचं नाव व्हिक्टोरिया गार्डन होतं. 1934 मध्ये जेव्हा महात्मा गांधी कराचीला आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी इथे एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर याचं अधिकृत नाव गांधी गार्डन करण्यात आलं. ते याच नावाने प्रसिद्ध झालं. आजही जुन्या पिढीतील लोक त्याला गांधी गार्डनच म्हणतात.
परंतु, नव्या पिढीला हे ठिकाण कराची प्राणिसंग्रहालय (कराची झू) म्हणूनच माहीत आहे. मुलंही आपण प्राणिसंग्रहालयात फिरायला जात असल्याचं सांगतात.
जानेवारी 1953 मध्ये याचं नाव बदलून कराची झूलॉजिकल गार्डन करण्यात आलं.
पण बराच काळ लोकांच्या तोंडी गांधी गार्डन हेच नाव होतं. बस थांबली की कंडक्टर मोठ्याने हाक मारायचा, "गांधी गार्डनला जाणारे प्रवासी, पुढे या."
शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेल्या प्रसिद्ध पाकिस्तान चौकाचं नावही पूर्वी गांधी चौक असंच होतं.
महात्मा गांधी जेव्हा कराचीला आले होते, तेव्हा हिंदू समाजातील लोकांनी या चौकाचं नाव त्यांच्या नावावरून ठेवलं होतं.
पटेल पार्कचं नाव निश्तर पार्क कसं पडलं?
गांधी गार्डनच्या पुढे सोल्जर बाजार भागात गेलं की तिथल्या एका उद्यानाकडे किंवा मैदानाकडे सर्वांचं लक्ष जातं.
पूर्वी याला पटेल पार्क म्हटलं जायचं. परंतु, कालांतराने त्याचं नाव बदलून निश्तर पार्क करण्यात आलं.
पटेल पार्कचं नाव भारताचे माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं, हे अजिबात खरं नाही.
खरं तर याचं नाव त्यांचे भाऊ विठ्ठलभाई पटेल यांच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं.
नंतर याचं नाव बदलून सरदार अब्दुर रब निश्तर यांचं नाव देण्यात आलं.
परंतु, बराच काळ लोक याला निश्तर पार्कऐवजी पटेल पार्कच म्हणत होते. अनेक वर्षांनंतर ते निश्तर पार्क या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
पटेल पार्क म्हणजेच आताचं निश्तर पार्क हे क्लब क्रिकेटचं एक महत्त्वाचं केंद्र राहिलं आहे. ब्रिटिशांच्या काळातच इथे क्रिकेट खेळायला सुरुवात झाली होती.
या मैदानावर नियमितपणे क्लबचे सामने खेळणारे अनेक खेळाडू पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू बनले.
निश्तर पार्क हे राजकीय आणि धार्मिक पक्षांच्या सभांसाठीही महत्त्वाचं ठिकाण आहे.
इथे आजही ईद मिलादुन्नबी आणि मोहरमचे धार्मिक कार्यक्रम होतात. ईदची नमाजही याच ठिकाणी अदा केली जाते.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
एप्रिल 2006 मध्ये याच निश्तर पार्कमध्ये ईद मिलादुन्नबीच्या कार्यक्रमादरम्यान बॉम्बस्फोट झाला होता. त्यात अनेकांचा मृत्यू झाला होता.
1970 मध्ये शेख मुजीबुर रहमान आणि 1971 मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी याच निश्तर पार्कमध्ये मोठमोठ्या सभा घेतल्या होत्या. याच सभांमधून त्यांनी आपली लोकप्रियताही दाखवून दिली होती.
याच निश्तर पार्कजवळ प्रसिद्ध सिंधी नेते जी. एम. सय्यद यांचं हैदर मंझिल हे घर आहे. त्यांच्या हयातीत हे घर राजकीय घडामोडींचं एक महत्त्वाचं केंद्र होतं.
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर रस्त्यांची आणि ठिकाणांची हिंदू नावं बदलण्यास सुरुवात झाली होती. 1965 च्या युद्धानंतर या प्रक्रियेला आणखी वेग आला.
याच युद्धानंतर पटेल पार्कचं नाव बदलून निश्तर पार्क करण्यात आलं होतं.
इक्बाल ए रहमान मांडविया यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, "1958 मध्ये सरदार अब्दुर रब निश्तर यांची अंत्यसंस्काराची प्रार्थना याच उद्यानात मौलाना एहतेशाम-उल-हक थानवी यांनी केली होती."
"त्यानंतर 1980 मध्ये मौलाना एहतेशाम-उल-हक थानवी यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मौलाना एहतराम-उल-हक थाई यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची प्रार्थना केली होती."
"फार कमी लोकांना माहिती असेल की पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू हनीफ मोहम्मद यांच्या लग्नाचा स्वागत समारंभही याच उद्यानात पार पडला होता."
शहरातील हिंदू नावं असलेले बहुतांश रस्ते जुन्या भागांत होते.
ज्या रस्त्यांची आणि भागांची नावं बदलली गेली, त्या सर्वांची माहिती एका लेखात देणं शक्य नाही.
शहरातील काही प्रसिद्ध रस्त्यांची हिंदू नावं बदलून मुस्लीम नावं ठेवण्यात आली.
न्यूनहम रोडचं नाव बदलून फखर मात्री रोड ठेवण्यात आलं. फखर मात्री हे कराचीमधून प्रकाशित होणाऱ्या उर्दू भाषेतील 'हुर्रियत' आणि गुजराती भाषेतील 'मिल्लत' या वृत्तपत्रांचे संस्थापक होते.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
हरचंद राय विशन दास रोडचं नाव बदलून सिद्दीक वहाब रोड करण्यात आलं.
आत्माराम प्रीतम दास रोडचं नाव आधी बदलून अल्ताफ हुसेन हाली रोड ठेवण्यात आलं. आता या रस्त्याचं नाव शाह अब्दुल लतीफ भिटाई रोड असं करण्यात आलं आहे.
रेडिओ पाकिस्तानच्या कराची स्टेशनच्या इमारतीमागे रतन तलाव हा परिसर आहे. हा भाग रतन तलाव याच नावाने ओळखला जातो. इथे एक मंदिरही आहे.
पूर्वी हा परिसर मराठा समाजामुळे ओळखला जायचा. या समाजाचे रतनजी हे नेते होते. त्यांच्याच नावावरून हा परिसर रतन तलाव या नावाने प्रसिद्ध झाला.
इथे पूर्वी एक तलाव होता. परंतु, पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर तो तलाव इतिहासजमा झाला.
बबिता, साधना, मॅक मोहन आणि रमेश सिप्पींची जन्मभूमी
कराचीचा इतिहास आणि तिथल्या प्रसिद्ध व्यक्तींवर लेखन करणारे शाह वलीउल्लाह जुनैदी यांच्या माहितीनुसार, कपूर कुटुंबाची सून आणि करीना-करिश्मा कपूर यांची आई बबिता यांचा जन्म 20 एप्रिल 1947 रोजी रतन तलाव परिसरात झाला होता.
त्यावेळी त्यांचं पूर्ण नाव हे बबिता शिवदासानी होतं.
बबिता काही महिनेच कराचीमध्ये राहिल्या. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईला गेल्या.

फोटो स्रोत, Farzan Rasheed
शाह वलीउल्लाह जुनैदी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचा जन्म कराचीच्या सदर भागात झाला होता.
'शोले' चित्रपटातील सांभाच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेले मॅक मोहन यांचा जन्म होती मार्केटजवळील ज्युबिली सिनेमा परिसरात झाला होता.
पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर कराचीमध्ये बांधलेलं हे पहिलं चित्रपटगृह होतं.
इक्बाल मांडविया यांच्या माहितीनुसार, "भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री साधना यांचा जन्म सप्टेंबर 1941 मध्ये राम स्वामी येथील तुलसीदास स्ट्रीटजवळील एका गल्लीत सिंधी हिंदू कुटुंबात झाला होता."
"त्यावेळी त्यांचं नाव साधना शिवदासानी होतं. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर त्यापण आपल्या कुटुंबासोबत कराची सोडून भारतात आल्या होत्या."
रस्त्यांवरून इंग्रजी नावंही गायब झाली
पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर केवळ हिंदू नावं असलेल्या रस्त्यांची आणि परिसरांची नावं बदलली नाहीत, तर इंग्रजी नावंही बदलण्यात आली.
अशी नावं बदललेल्या रस्त्यांची यादीही मोठी आणि रंजक आहे.
ब्रिटिश राजवटीत सिंधचे गव्हर्नर असलेल्या जोनाथन डंकन इन्व्हेरॅरिटी यांच्या नावावरून या रस्त्याला इन्व्हेरॅरिटी रोड असं नाव देण्यात आलं होतं. मी स्वतः बरीच वर्षे या रस्त्यावर जुन्या नावाचा फलक पाहिलेला आहे.
कराची प्रेस क्लबही याच रस्त्यावर आहे. एकेकाळी इथे ग्योथे इन्स्टिट्यूट देखील होतं.
नंतर या रस्त्याचं नाव बदलून सरवर शहीद रोड करण्यात आलं. पाकिस्तानचा सर्वोच्च लष्करी सन्मान 'निशान-ए-हैदर' मिळवणारे ते पहिले सैनिक होते.

फोटो स्रोत, Farzaan Rasheed
लॉरेन्स रोड हा कराचीच्या जुन्या शहरातील (ओल्ड सिटी) सर्वांत लांब रस्ता आहे. भारताचे व्हाइसरॉय सर जॉन लॉरेन्स यांच्या नावावरून त्याला हे नाव देण्यात आलं होतं. नंतर या रस्त्याचं नाव बदलून निश्तर रोड ठेवण्यात आलं.
अनेक बँकांची मुख्य कार्यालयं, वृत्तपत्रांची आणि टीव्ही वाहिन्यांची कार्यालयं असलेला गजबजलेला मॅक्लिऑड रोड आता पाकिस्तानचे सहावे पंतप्रधान इब्राहिम इस्माईल चुंद्रीगर यांच्या नावाने ओळखला जातो. त्याला आता आय. आय. चुंद्रीगर रोड म्हणतात.
क्वीन्स रोडचं नाव बदलून आता मौलवी तमीजुद्दीन खान रोड ठेवण्यात आलं आहे. मौलवी तमीजुद्दीन खान हे पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष (स्पीकर) होते.

फोटो स्रोत, Farzaan Rasheed
समरसेट स्ट्रीटचं नाव बदलून आता राजा गझनफर अली खान रोड ठेवण्यात आलं आहे.
सोलोमन डेव्हिड रोडचं नाव बदलून सुलेमान दाऊद रोड असं करण्यात आलं आहे.
सिंध उच्च न्यायालयाच्या मागच्या बाजूने सुरू होणाऱ्या आणि सेंट पॅट्रिक चर्चजवळ संपणाऱ्या क्लार्क स्ट्रीटला आता शाहराह-ए-इराक असं नाव देण्यात आलं आहे.
एल्फिन्स्टन स्ट्रीटचं नाव बदलून आता झेबुन्निसा स्ट्रीट असं करण्यात आलं आहे.
कराचीसाठी जेम्स स्ट्रेचन यांचं योगदान
कराची आर्ट्स कौन्सिल आणि हिंदू जिमखाना असलेल्या गजबजलेल्या भागातील चौकापासून पाकिस्तान चौकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला पूर्वी स्ट्रेचन रोड म्हटलं जायचं.
नंतर या रस्त्याचं नाव बदलून मौलाना दीन मोहम्मद वफाई रोड असं करण्यात आलं.
संशोधक उस्मान दमोहवी यांनी आपल्या 'कराची तारीख के आईने में' या पुस्तकात लिहिलं आहे, "कराची शहराची आखणी करण्यात जेम्स स्ट्रेचन यांची महत्त्वाची भूमिका होती. ते इंजिनिअर होते. 1873 मध्ये त्यांची कराची नगरपालिकेच्या मुख्य अभियंता आणि सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती."
"कराचीमध्ये वीज, टेलिफोन, रस्त्यांवरील दिवे आणि घराघरांत पाणी पोहोचवण्याच्या योजना जेम्स स्ट्रेचन यांच्यामुळेच प्रत्यक्षात आल्या होत्या."
"त्यांनी कराचीमध्ये ट्राम कंपनी सुरू करून ट्रामसेवाही सुरू केली. याशिवाय, कराची बंदराजवळील केमारी भागात एक रुग्णालयही बांधलं."

फोटो स्रोत, Farzaan Rasheed
दुसरीकडे, मौलाना दीन मोहम्मद वफाई हे धर्माचे अभ्यासक होते. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली होती.
ते 'अल वहीद' या वृत्तपत्राचे संपादकही होते. निर्भीड आणि धाडसी पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.
इंगल रोडचं नाव बदलून आता एम. आर. कयानी रोड असं करण्यात आलं आहे. एम. आर. कयानी हे पश्चिम पाकिस्तान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.
सर चार्ल्स नेपियर यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नेपियर रोडचं नाव बदलून आता शाहराह अल्ताफ हुसेन करण्यात आलं आहे.
व्हिक्टोरिया रोडचं नाव आता अब्दुल्ला हारून रोड आहे.

फोटो स्रोत, Farzaan Rasheed
हॅवलॉक रोडचं नाव बदलून ऐवान-ए-सदर रोड ठेवण्यात आलं आहे.
कराचीतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना करणारे वास्तुविशारद मोसेस सोमेक यांच्या नावावरून मोसेस स्ट्रीट हे नाव पडलं होतं. आता या रस्त्याचं नाव बदलून मूसा जी स्ट्रीट करण्यात आलं आहे.
कराचीतील हा सर्वांत लांब रस्ता केमारी बंदरापर्यंत जात असल्यामुळे त्याला बंदर रोड असं म्हटलं जात.
आता पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांच्या नावावरून या रस्त्याचं नाव एम. ए. जिना रोड ठेवण्यात आलं आहे. परंतु, आजही अनेक लोक त्याला जुन्याच नावाने, म्हणजे बंदर रोड या नावानेच ओळखतात.
होय, हा तोच बंदर रोड आहे, जो आजही लोकांना अहमद रुश्दी यांच्या गाण्यामुळे आठवतो.
"बंदर रोड से केमारी, चली रे मेरी घोड़ा गाड़ी, बाबू हो जाना फ़ुटपाथ पर."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























