9 वर्षांच्या मुलीच्या मृत्यूला कारण ठरलेलं प्रदूषण, जाणून घ्या जगभर चर्चेचा विषय ठरलेली 'ती' घटना

एला अडू-किस्सी-डेब्राह दक्षिण-पूर्व लंडनमधील साऊथ सर्क्युलर रोडपासून अवघ्या 25 मीटर अंतरावर राहत होती.
फोटो कॅप्शन, एला अडू-किस्सी-डेब्राह दक्षिण-पूर्व लंडनमधील साऊथ सर्क्युलर रोडपासून अवघ्या 25 मीटर अंतरावर राहत होती.
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

मुंबईसह देशभरात सध्या वायुप्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुंबईसह देशाची राजधानी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, अमृतसर या शहरांमध्ये वायुप्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे.

धूर आणि धुक्यांमुळे दिल्लीभोवती एक जाड थर तयार झाला आहे. इथल्या हवेची गुणवत्ता अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. जगभरातील अनेक देशांमध्येही वायू प्रदुषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचे समोर येत आहे.

याचा आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. वायू प्रदुषणाने गाठलेली धोक्याची पातळी आपल्या जीवावरही बेतू शकते. ही केवळ शक्यता नसून प्रदुषणाने मृत्यू झाल्याचं एक प्रकरणही याआधी समोर आलं आहे. याची जगभरात चर्चा झालेली. हे नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊयात.

2013 मध्ये वायुप्रदूषणामुळे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला होता. दम्याच्या झटक्यानंतर मृत्यू झालेल्या 9 वर्षांच्या या मुलीच्या मृत्यूचं कारण म्हणून वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली होती.

युनायटेड किंगडममध्ये अशा प्रकारे मृत्यूचं कारण म्हणून वायुप्रदूषणाची नोंद होण्याची ही पहिलीच घटना ठरली.

या मुलीचं नाव होतं एला अडू-किस्सी-डेब्राह. ती दक्षिण-पूर्व लंडनमधील लुईशॅम परिसरातील साऊथ सर्क्युलर रोडजवळ राहायची.

लंडनमधील साऊथवॉर्क कोरोनर्स न्यायालयाने एलाच्या मृत्यूला वायुप्रदूषणही 'कारणीभूत' ठरल्याचा निष्कर्ष काढला होता.

वायुप्रदूषणाबाबत सरकारला सल्ला देणारे प्रा. गॅव्हिन शॅडिक यांनी या निर्णयाला 'एक ऐतिहासिक निर्णय' असं म्हटलं होतं.

मुलीच्या मृत्यूपूर्वी आपल्या परिसरातील वायुप्रदूषण किती धोकादायक आहे, याची मला माहिती नव्हती, असं एलाची आई रोझमंड अडू-किस्सी-डेब्राह यांनी सांगितलं.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2 आठवडे चाललेल्या या चौकशीच्या शेवटी, कोरोनर (मृत्यूची चौकशी करणारा अधिकारी) फिलिप बार्लो यांनी सांगितलं की, एला अति किंवा जास्त प्रमाणात वायुप्रदूषणाच्या संपर्कात आली होती.

चौकशीदरम्यान सांगण्यात आलं की, मृत्यूच्या आधीच्या 3 वर्षांत एलाला अनेकवेळा दम्याचे तीव्र झटके (फिट्स) आले होते. तिला 27 वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं.

निकाल देताना कोरोनर बार्लो यांनी सांगितलं की, एलाच्या घराजवळ हवेतील नायट्रोजन डायऑक्साइड (एनओ2) या प्रदूषकाचं प्रमाण जागतिक आरोग्य संघटना आणि युरोपीय महासंघाने ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं.

ते पुढे म्हणाले होते, "हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडचं प्रमाण कमी करण्यात यंत्रणांना अपयश आलं. याचाही तिच्या मृत्यूला हातभार लागला असण्याची शक्यता आहे."

"एलाच्या आईला पुरेशी माहिती देण्यात आली नव्हती. याचाही तिच्या मृत्यूला हातभार लागला असण्याची शक्यता आहे."

जवळपास तासभर निकालाचं वाचन केल्यानंतर कोरोनर म्हणाले, "दम्यामुळे एलाचा मृत्यू झाला. परंतु, जास्त प्रमाणातील वायुप्रदूषणाच्या संपर्कात आल्यामुळे तिची प्रकृती आणखी बिघडली होती."

निकालानंतर एलाची आई रोझमंड अडू-किस्सी-डेब्राह म्हणाल्या होत्या, "एलाला जो न्याय मिळायला हवा होता, तो अखेर तिला मिळाला आहे."

"परंतु, हा प्रश्न केवळ एलापुरताच मर्यादित नाही. आपल्या शहरात आजही अनेक मुलं जास्त वायुप्रदूषण असलेल्या भागांतून ये-जा करत आहेत. त्यांचाही विचार व्हायला हवा."

अहवालातील निष्कर्ष 'इतके स्पष्ट आणि सविस्तर' असतील, याची आपल्याला अपेक्षा नव्हती. त्यामुळे आपल्याला आश्चर्याचा 'धक्का' बसल्याचं एलाच्या आई म्हणाल्या होत्या.

'प्रत्येक श्वासासाठी संघर्ष'

एलाला पहिल्यांदा 2010 मध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिला सतत खोकल्याचा त्रास होत होता, असं रोझमंड यांनी चौकशीदरम्यान सांगितलं.

वयाच्या 6व्या वर्षी तिची प्रकृती स्थिर करण्यासाठी तिला औषधांच्या मदतीने 3 दिवस बेशुद्ध अवस्थेत (कोमा) ठेवण्यात आलं होतं.

2012 च्या उन्हाळ्यापर्यंत एलाला 'दिव्यांग' म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तिच्या आईने सांगितलं की, तिला बाहेर नेण्यासाठी अनेकदा पाठीवर घेऊन जावं लागत असे.

अडू-किस्सी-डेब्राह म्हणाल्या, "एलाला जेव्हा तातडीने रुग्णालयात न्यावं लागायचं, तेव्हा अनेकदा तिला व्यवस्थित श्वासही घेता येत नव्हता, हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे."

"ती आणीबाणीची परिस्थिती होती. तिला हृदयविकाराचा झटकाही (कार्डियाक अरेस्ट) आला होता."

दम्याचा तीव्र झटका (अस्थमा अटॅक) आल्यानंतर 15 फेब्रुवारी 2013 रोजी पहाटे एलाचा मृत्यू झाला.

श्वास घेण्याच्या त्रासामुळे एलाला दिव्यांग म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं.
फोटो कॅप्शन, श्वास घेण्याच्या त्रासामुळे एलाला दिव्यांग म्हणून वर्गीकृत करण्यात आलं होतं.

2018 च्या एका अहवालात स्पष्ट झालं की, एलाच्या घरापासून 1 मैल अंतरावर असलेल्या प्रदूषण मोजणाऱ्या केंद्रात हवेतील प्रदूषणाचं प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त होतं. या प्रदूषणामुळेच एलाला दम्याचा जीवघेणा झटका आला होता.

या अहवालाचे लेखक प्रा. सर स्टीफन होलगेट यांनी सांगितलं की, मृत्यूच्या आधीच्या काही महिन्यांत एलाची प्रकृती 'अत्यंत नाजूक' होती. तिचा जीव कधीही धोक्यात येऊ शकत होता.

चौकशीदरम्यान असं समोर आलं की, वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या धोक्यांची एलाच्या कुटुंबाला कल्पनाच नव्हती.

चौकशीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अर्नोल्ड श्वार्झनेगर यांनी एलाच्या आई अडू-किस्सी-डेब्राह यांना पत्र लिहून त्यांना 'हिरो' म्हटलं होतं.

हॉलिवूड अभिनेता आणि कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर अर्नोल्ड श्वार्झनेगर हे स्वच्छ हवेसाठीच्या कठोर नियमांचे समर्थन करत आले आहेत. त्यांनी एलाच्या आईचे आभार मानताना म्हटलं होतं, "त्यांनी वायुप्रदूषण हे किती घातक आहे, हे जगासमोर आणलं आहे."

बीबीसीचे पर्यावरण विश्लेषक रॉजर हॅराबिन यांनी काय म्हटलं?

या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना बीबीसीचे पर्यावरण विश्लेषक रॉजर हॅराबिन म्हणाले होते, "हा एक ऐतिहासिक निर्णय आहे.

सामान्यतः तज्ज्ञ वायुप्रदूषणाचा संबंध अकाली मृत्यूशी असल्याचं सांगतात. कारण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू केवळ वायुप्रदूषणामुळे झाला किंवा त्याचा मृत्यू होण्यात प्रदूषणाचाही वाटा होता, हे निश्चितपणे सांगणं शक्य नसतं.

या प्रकरणात एलाच्या अकाली मृत्यूला तिने घेतलेल्या प्रदूषित हवेलाही (श्वास) काही अंशी जबाबदार धरलं आहे.

यामुळे युनायटेड किंगडममधील सामाजिक समानतेबाबतची चर्चा आणखी तीव्र होईल.

गरीब लोकांना सर्वाधिक प्रदूषित हवेत राहावं लागतं. तर दुसरीकडे, देशातील श्रीमंत लोक सर्वाधिक अंतरापर्यंत वाहन चालवतात किंवा गाडीने प्रवास करतात.

प्रदूषणाविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. यामध्ये लंडनमधील वाहनांसाठीचा स्वच्छ हवा विभाग एम25 महामार्गापर्यंत वाढवणे, तसेच ब्रिटनमधील रस्ते चालण्यासाठी आणि सायकल चालवण्यासाठी अधिक सुरक्षित व सोयीचे करणे, अशा उपायांचा समावेश आहे.

परंतु, वायुप्रदूषण होण्यामागे अनेक कारणं आहेत. गॅसवर चालणारे बॉयलर, बांधकामासाठी वापरली जाणारी यंत्रं, रंगकाम, तसेच वाहनांचे ब्रेक आणि टायर यांतून निघणारी धूळ यामुळेही प्रदूषण वाढतं.

शेवटी, युनायटेड किंगडममधील काही मोठ्या शहरांमधील हवा पूर्णपणे प्रदूषणमुक्त करणं शक्य होणार नाही."

'मोठी उलथापालथ'

एक्सेटर विद्यापीठाच्या डेटा सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. शॅडिक यांनी म्हटलं होतं की, या चौकशीच्या निकालामुळे "भविष्यात आपण घेत असलेली हवा स्वच्छ करण्याचे प्रयत्न अधिक सोपे होतील, अशी त्यांना आशा आहे".

ते पुढे म्हणाले, "मात्र, यासाठी एलाच्या प्रकरणाची वाट पाहावी लागली, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे."

लंडनचे महापौर सादिक खान यांनाही या चौकशीदरम्यान संबंधित पक्ष म्हणून सहभागी करण्यात आलं होतं. त्यांनी या निकालाला 'एक महत्त्वाचा ऐतिहासिक टप्पा' असं म्हटलं होतं.

सादिक खान म्हणाले होते, "एलाच्या कुटुंबाला ज्या दुःखातून जावं लागलं, ते इतर कोणत्याही कुटुंबाच्या वाट्याला येऊ नये. त्यासाठी आजचा दिवस टर्निंग पॉइंट ठरायला हवा."

"यापूर्वी मंत्री आणि लंडनच्या माजी महापौरांनी या प्रश्नावर खूप उशिराने आणि संथ गतीने पावलं उचलली. परंतु, आता त्यांनी कोरोनरच्या या निकालातून धडा घेतला पाहिजे."

एला राजधानीतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या साऊथ सर्क्युलर रोडपासून अवघ्या 25 मीटर अंतरावर राहत होती.
फोटो कॅप्शन, एला राजधानीतील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांपैकी एक असलेल्या साऊथ सर्क्युलर रोडपासून अवघ्या 25 मीटर अंतरावर राहत होती.

अस्थमा यूके आणि ब्रिटिश लंग फाउंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सारा वुलनॉफ यांनी सरकारकडे तातडीने सार्वजनिक आरोग्य योजना जाहीर करण्याची मागणी केली. या योजनेतून लोकांचं 'विषारी हवे'मुळे होणाऱ्या प्रदूषणापासून संरक्षण केलं जावं, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्या म्हणाल्या होत्या, "आजचा हा महत्त्वाचा निकाल मिळावा यासाठी एलाच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला, लढा दिला. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."

"या निकालामुळे वायुप्रदूषणाच्या आरोग्यावरील गंभीर परिणामांचा सामना करण्यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन आणि डॉक्टरांना एकत्र येऊन अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणावर काम करावं लागेल. या निकालामुळे त्यासाठी नवीन मार्ग तयार झाला आहे."

या निकालावर प्रतिक्रिया देताना सरकारच्या प्रवक्त्याने म्हटलं होतं, "आमच्या सहवेदना एलाच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत आहेत."

"वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नायट्रोजन डायऑक्साइडचं प्रदूषण रोखण्यासाठी आम्ही 3.8 अब्ज पौंडांची (सुमारे 47 हजार 700 कोटी रुपये) योजना राबवत आहोत. तसेच, वायुप्रदूषणापासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी आणखी उपाययोजना करत आहोत."

लुईशॅमचे तत्कालीन महापौर डॅमियन ईगन म्हणाले होते की, स्वच्छ हवेसाठी एला अडू-किस्सी-डेब्राह यांच्या आईने केलेल्या प्रयत्नांचा 'मोठा परिणाम' झाला आहे.

"हा निकाल कायमस्वरूपी बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, अशी आम्हाला आशा आहे. वायुप्रदूषण रोखण्यासाठी सरकारने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज आहे, हे या निकालातून स्पष्ट व्हावं," असंही त्यांनी नमूद केलं होतं.

एला अडू-किस्सी-डेब्राह
फोटो कॅप्शन, एला अडू-किस्सी-डेब्राह

दरम्यान, एलाच्या मृत्यूला वायुप्रदूषणही कारणीभूत ठरल्याचं ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच मान्य करण्यात आलं होतं. यावर एलाच्या आईने म्हटलं होतं की, सरकारसोबतचा कायदेशीर वाद मिटवूनही आपला विजय होणार नाही, याची त्यांना जाणीव होती.

रोझमंड म्हणाल्या होत्या की, सरकारसोबतचा कायदेशीर वाद किती रक्कम देऊन मिटवण्यात आला, हे जाहीर करण्यात आलेलं नाही. पण, हा त्यांचा विजय नव्हता. कारण, 'तुमचं मूल आधीच या जगात नाही.' पण या प्रकरणामुळे एलासोबत नेमकं काय घडलं, याची सरकारने दखल घेतली, असं त्या म्हणाल्या.

एलाच्या मृत्यूबद्दल सरकारने तिची आई रोझमंड अडू-किस्सी-डेब्राह यांची 'मनापासून माफी' मागितली. तसेच, हवा स्वच्छ करण्यासाठी 'महत्त्वाकांक्षी योजना' राबवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचंही सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)