मिडटर्म निवडणूक: ट्रम्प यांच्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर इराणचा इशारा, 'पुन्हा हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देणार'

अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
फोटो कॅप्शन, अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेच्या मध्यावधी (मिडटर्म) निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाला मिळालेल्या विजयानंतर इराणच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन जनतेने युद्धाच्या विरोधात मतदान केल्याचा त्यांनी दावा केला आहे.

दरम्यान, निवडणुकीच्या काही तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर लगेचच हल्ला करण्याचा अमेरिकेचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते. मात्र, गरज पडल्यास कारवाई करण्यासाठी अमेरिका तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं होतं. निवडणुकीनंतर इराणमधील युद्धाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. ताज्या निकालांनुसार, अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृह असलेल्या सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 54, तर रिपब्लिकन पक्षाचे 44 सदस्य आहेत.

अमेरिकन संसदेचं कनिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे 228, तर रिपब्लिकन पक्षाचे केवळ 139 सदस्य आहेत. या सभागृहात बहुमतासाठी 218 जागांची आवश्यकता आहे. अद्याप 68 जागांचे निकाल येणं बाकी आहे. म्हणजेच, दोन्ही सभागृहांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाने बहुमताचा आकडा पार केला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर इराणने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेनं पुन्हा हल्ला केल्यास त्याला आधीपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणनं म्हटलं आहे.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, अमेरिकेनं वास्तव आणि इतिहासातील धडे दुर्लक्षित करून हा धोकादायक मार्ग कायम ठेवला, तर त्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागेल.

त्यांनी पुढे लिहिलं, "या मोठ्या चुकीचे परिणाम आतापर्यंत पाहिलेल्या परिणामांपेक्षा कितीतरी गंभीर असतील."

इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या (आयआरजीसी) भूदलाचे कमांडर मोहम्मद करमी यांनीही चुकीचा अंदाज पुन्हा करण्याविरोधात इशारा दिला आहे.

यापूर्वी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनीही इराणवर पुन्हा हल्ला झाल्यास त्यांची प्रत्युत्तराची कारवाई अधिक व्यापक असेल, असं म्हटलं होतं.

इराणने अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीच्या निकालांकडे कसं पाहिलं?

अमेरिकेच्या मिडटर्म निवडणुकीच्या निकालांवर इराणकडून पहिली प्रतिक्रिया संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी दिली.

त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "हा निर्णय लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीचा आवाज असो किंवा वाढत्या महागाईचा परिणाम, अमेरिकेच्या जनतेनं युद्धाला नकार दिला आहे आणि आम्ही त्यांच्या या संदेशाचे समर्थन करतो."

इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ म्हणाले की, अमेरिकन जनतेने हे सिद्ध केले आहे की ते इराणसोबतच्या युद्धाच्या बाजूने नाहीत.
फोटो कॅप्शन, इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ म्हणाले की, अमेरिकन जनतेने हे सिद्ध केले आहे की ते इराणसोबतच्या युद्धाच्या बाजूने नाहीत.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी जनतेचा हा संदेश दुर्लक्षित केला, तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असेही त्यांनी म्हटलं.

याचदरम्यान, मोज्तबा खामेनेई यांचा संदेश इस्लामिक रिपब्लिकच्या सर्वोच्च नेत्याच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला. अमेरिकी दूतावासावरील ताब्याच्या वर्धापनदिनानिमित्त आणि 'राष्ट्रीय जागतिक अहंकारविरोधी दिना'च्या निमित्ताने हा संदेश जारी करण्यात आला होता.

या संदेशात म्हटले आहे की, 40 दिवस चाललेल्या युद्धादरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील इराणचे नियंत्रण आणि परिसरातील देशांमधील अमेरिकेचे लष्करी तळ उद्ध्वस्त करणे ही इराणची सुरुवातीची प्रतिक्रिया होती.

अमेरिकेनं पुन्हा हल्ला केल्यास इराणची प्रत्युत्तराची कारवाई अधिक व्यापक असेल, असा इशाराही या संदेशातून देण्यात आला आहे.

संदेशात म्हटले आहे, "इराणच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रगतीचे धोरण पूर्ण ताकदीने सुरू ठेवले पाहिजे, जेणेकरून कोणत्याही हल्ल्याचा सामना करण्यासाठी पूर्ण प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण करता येईल."

निवडणुकीच्या काही तास आधी ट्रम्प काय म्हणाले होते?

अमेरिकी निवडणुकीतील मतदान संपण्याच्या काही तास आधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फायनान्शियल टाइम्स'ला फोनवरून मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत त्यांनी इराणवर तातडीने हल्ला करण्याचा अमेरिकेचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले होते.

ट्रम्प यांनी सध्याची परिस्थिती 'उत्कृष्ट' असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले होते, "आम्हाला जे हवं आहे, ते सर्व मिळत असल्याचे दिसत आहे."

अमेरिका प्रत्यक्षात इराणसोबत युद्धात नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने बी-2 विमानांच्या मदतीने हल्ला करून इराणची अण्वस्त्र क्षमता नष्ट केली होती.

मात्र, या आठवड्यात इराणवर पुन्हा हल्ला होऊ शकतो का, असे विचारले असता ट्रम्प म्हणाले, "मी तयार आहे, आम्ही तयार आहोत. गरज पडल्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत. पण, कदाचित त्याची गरजच पडणार नाही."

डोनाल्ड ट्रम्प

युद्ध सुरू ठेवण्यासाठीही अमेरिका तयार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटलं होतं.

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेलाच्या वाहतुकीचा उल्लेख करताना त्यांनी युद्धापूर्वीच्या तुलनेत आता या मार्गावरून अधिक तेलाची वाहतूक होत असल्याचे सांगितलं होतं.

इराणसोबत सुरू असलेल्या अप्रत्यक्ष चर्चेबाबत बोलताना त्यांनी समृद्ध युरेनियमच्या साठ्याचे भवितव्य हा देखील चर्चेतील एक मुद्दा असल्याचे सांगितले.

इराणविरोधात अमेरिकेने केलेली नौदलाची नाकेबंदी आणि लादलेले निर्बंध लक्षात घेता सध्याची परिस्थिती अमेरिकेसाठी अनुकूल असल्याचे ट्रम्प म्हणाले होते.

निकालानंतर ट्रम्प काय म्हणाले?

मध्यावधी निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनी इराणमधील युद्धाचा निवडणुकीच्या निकालावर परिणाम झाल्याचे मान्य केले.

'वॉल स्ट्रीट जर्नल'ला दिलेल्या फोनवरील मुलाखतीत इराणमधील युद्धामुळे रिपब्लिकन पक्षाची कामगिरी खराब झाली का, असं विचारण्यात आलं. त्यावर ट्रम्प म्हणाले, "इराण हे देखील त्यामागचे एक कारण होतं."

मात्र, युद्ध सुरू करण्याच्या निर्णयाबद्दल त्यांनी कोणताही पश्चात्ताप व्यक्त केला नाही. ते म्हणाले, "मी योग्य निर्णय घेतला. पुन्हा अशी वेळ आली, तरीही मी हाच निर्णय घेईन."

युद्धाच्या तुलनेत तेलाच्या वाढत्या किमती हे रिपब्लिकन पक्षासाठी निवडणुकीतील मोठे आव्हान ठरल्याचेही ट्रम्प यांनी म्हटलं. इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे मतदार नाराज होते, असं त्यांनी सांगितलं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.