'सीतेचे वडील, रामाचे नातेवाईक', जगातल्या वेगवेगळ्या 'रामायणां'मध्ये रावणाबाबत आहे 'अशी' रंजक माहिती
![[ photo caption- रावणाचा पुतळा, श्रीलंका ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/3bd0/live/83208600-da58-11f1-93e1-3b657b665bcf.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
- Author, सिराज
- Role, बीबीसी तमिळ
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
रामायण. ही कथा आत्तापर्यंत किती वेळा आणि किती प्रकारांनी सांगितली गेली आहे, याचा काही हिशेबच नाही.
वर्षानुवर्षे सांगितली जाणारी ही कथा धर्म-जातीच्या सीमा ओलांडून भारतातील बहुतेक सर्वांनाच ठाऊक आहे. आजवर रामायणावर अनेक सिनेमे येऊन गेले. तरीसुद्धा, रुपेरी पडद्यावर रामायणाची कथा येते, तेव्हा प्रत्येक वेळी लोकांमध्ये एक नवीन उत्सुकता निर्माण होते.
आता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि यश यांच्या मुख्य भूमिका असलेला भव्य बजेटमध्ये साकारलेला 'रामायण: भाग 1' हा चित्रपट 5 नोव्हेंबर ला प्रदर्शित झाला आहे.
आतापर्यंत पडद्यावर आलेल्या रामायणावरील इतर सिनेमांपेक्षा या चित्रपटात काहीतरी खास फरक असल्याचे दिसत आहे.
हा सिनेमा प्रामुख्याने महर्षी 'वाल्मिकींच्या रामायणावर' आधारित आहे. रामायण फक्त भारतातच नाही, तर थायलंड, मलेशिया, लाओससारख्या अनेक देशांमध्येही तितकेच लोकप्रिय आहे.
पण त्या देशांमधील रामायणाची कथा मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा थोडी वेगळी आहे. विशेष म्हणजे, त्यातील बहुतांश कथांमध्ये रावणाला ठरावीक 'खलनायक वा असूर' न दाखवता एका वेगळ्याच दृष्टिकोनातून मांडलेले आहे.
![[photo caption- रामायण: भाग 1' या सिनेमात यश रावणाच्या भूमिकेत झळकणार आहे.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/eb68/live/8c442750-da58-11f1-b441-2b33b063138f.png.webp)
फोटो स्रोत, Prime Focus Studios Monster Mind Creations DNEG
'जगात रामायणाचे अनेक प्रकार आहेत. वेगवेगळ्या भाषांमध्ये महाकाव्य, पुराणं, नाटकं, बाहुल्यांचे प्रयोग आणि शिल्पांच्या माध्यमातून ही कथा लोकांपर्यंत पोहोचली आहे,' असा उल्लेख प्रसिद्ध कवी, भाषाशास्त्रज्ञ आणि लोककथांचे अभ्यासक ए. के. रामानुजन यांनी 1987 मधील 'थ्री हंड्रेड रामायणाज' या आपल्या लेखात केला आहे.
थायलंडचे 'रामकीन'
वाल्मिकी रामायणावरून प्रेरित झालेले 'रामकीन' हे थायलंडचं शेकडो वर्षांचं जुनं आणि अत्यंत लोकप्रिय अभिजात साहित्यिक महाकाव्य मानले जाते.
थायलंडमध्ये जागोजागी रामकीनचा मोठा प्रभाव जाणवतो. तिथल्या राजांची नावे, प्रांत, रस्ते आणि ऐतिहासिक वास्तूंमध्ये याचे थेट संदर्भ आढळतात.
रामायण थायलंडमध्ये पहिल्यांदा कधी आले, याचा कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही. मात्र, भारतीय व्यापाऱ्यांमुळेच ते थायलंडपर्यंत आले असावे, असे थायलंड फाऊंडेशनने म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यातील सर्वात थक्क करणारी गोष्ट म्हणजे, थायलंडच्या रामकीनमध्ये 'सीतेला तोत्साकनची म्हणजे रावणाची मुलगी' म्हटले गेले आहे.
"नांग सिदा (सीता) ही प्रत्यक्षात तोत्साकनचीच मुलगी होती. परंतु तिच्या जन्मामुळं तिच्या वडिलांचे मोठे नुकसान होईल, असे ज्योतिषांनी सांगितले. त्यामुळे घाबरून तोत्साकनने तिला स्वतःच्या राज्याबाहेर घालवून दिले होते."
नंतरच्या काळात, "सीता आपलीच मुलगी आहे याची कल्पना नसताना तोत्साकन तिचे हरण करतो. या एका चुकीमुळे फ्रा राम (राम) आणि त्याच्यामध्ये मोठे युद्ध भडकते. या घनघोर युद्धात दोन्ही सैन्यांचे प्रचंड नुकसान होते आणि शेवटी तोत्साकनचा जीव जातो," अशी कथा थायलंडचे 'रामकीन' सांगते.
रामकीन'मध्ये रावणाची प्रतिभा आणि त्याच्या प्रचंड ज्ञानाचा गौरव करण्यात आला आहे. तिथे सीतेचे हरण करण्यामागे त्याचे प्रेम पाहिले जाते आणि या घटनेकडे सहानुभूतीने पाहिले जाते.
एका स्त्रीच्या प्रेमापोटी स्वतःचे कुटुंब, संपूर्ण राज्य आणि शेवटी स्वतःचा जीव गमावणाऱ्या रावणाच्या या बलिदानाबद्दल थायलंडच्या जनतेच्या मनात एक प्रकारची हळहळ आणि आदर आहे," असा उल्लेख ए. के. रामानुजन यांनी आपल्या शोधनिबंधात केला आहे.
मलेशियन महाकाव्य: 'हिकायत सेरी राम'
मुस्लिमबहुल देश असलेल्या मलेशियामधील रामायणाची आवृत्ती म्हणजेच 'हिकायत सेरी राम'. यावर इस्लामिक परंपरेचा मोठा प्रभाव पाहायला मिळतो.
या कथेनुसार, दहा तोंडं आणि वीस हात असणाऱ्या रावण नावाच्या असूर राजाला चारही लोकांचे राज्य मिळाले होते. पृथ्वी, स्वर्ग, समुद्र आणि पाताळ या चारही ठिकाणी त्याचेच साम्राज्य पसरले होते.
'रामकीन' महाकाव्यात रावणाच्या व्यक्तिरेखेला 'तोत्साकन' म्हटले जाते.
एका जहाजाद्वारे रावणाला सिलोन बेटावर म्हणजेच लंका-पुरीत आणले जाते आणि इथूनच त्याची कहाणी सुरू होते. तिथे त्याने तब्बल 12 वर्षे स्वतःला उलटे लटकवून घेत अत्यंत कठोर तप केले होते.
अशा रीतीने तपश्चर्येत मग्न असताना, प्रेषित आदम यांना स्वर्गातून खाली पाठवले जाते. तिथे त्यांची रावणाशी भेट होते. ते रावणाची विनंती मान्य करतात आणि त्याला चारही राज्यांचे साम्राज्य मिळावे म्हणून परमेश्वराकडे विनंती करण्याचे मान्य करतात. ही मागणी तत्काळ पूर्ण होते.
![[photo caption- 'फ्रा लक फ्रा लाम'चे सादरीकरण ]
(संग्रहित छायाचित्र)](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/e5bc/live/b97cb110-da58-11f1-b441-2b33b063138f.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
पुढे रावणाचे लग्न होते आणि त्याला इंद्रजित, पाताळ महारायन आणि गंगा महा-सुरी अशी 3 मुले होतात. रावण आपल्या मुलांना स्वर्ग, पाताळ आणि समुद्राच्या गादीवर बसवतो, तर लंका-पुरीचे राज्य मात्र स्वतःजवळच ठेवतो.
पण या महाकाव्यात रामाशी झालेल्या युद्धाच्या अखेरीस रावण मरत नाही. "युद्धादरम्यान रामाच्या बाणामुळे रावण खाली पडतो आणि त्याला पुन्हा उभे राहता येत नाही. मग राम रावणाजवळ जाऊन त्याचे तुकडे करतात, तरीही तो जिवंतच राहतो. त्यामुळे राम त्याला तिथेच सोडून आपल्या विशाल सेनेसह लंका-पुरीच्या किल्ल्यात निघून जातात. तिथे सीता देवी राहत असलेल्या महालाचे सौंदर्य बघून ते थक्क होतात," असे हिकायत सेरी राममध्ये वर्णन केले आहे.
लाओस देशाचे 'फ्रा लक फ्रा लाम'
आग्नेय आशियातील लाओस देशात रावण हा वाल्मिकी रामायणातील दहा तोंडांच्या असूर राजाप्रमाणे नाही, तर तो एका बौद्ध संदर्भातील आणि वातावरणात वावरणारं पात्र म्हणून समोर येतो.
यात 'फ्रा लक' म्हणजे रामाचा भाऊ लक्ष्मण आणि 'फ्रा लाम' म्हणजे खुद्द राम. या आवृत्तीत रावणाला 'हप्कनसुआने' म्हटले गेले आहे.
![[फोटो कॅप्शन: राम आणि रावणातील महायुद्ध दर्शवणारे एक चित्र]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/0475/live/c44d3f10-da58-11f1-a701-fddedf244c16.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
1972 च्या 'द फ्रा लक फ्रा लाम' या पुस्तकानुसार, रावण हा "कुठला बाहेरचा अमानुष राक्षस नाही तर फ्रा लाम आणि फ्रा लक यांच्याच राजघराण्यातील एक नातेवाईक आहे."
विशेष म्हणजे इथेही सीतेला रावणाचीच कन्या मानले गेले आहे.
रावणाची मुलगी म्हणून सीतेचा जन्म होतो. मात्र या मुलीमुळे तिच्या वडिलांचा सर्वनाश होईल, असे भाकीत रावणाचा ज्योतिषी करतो. त्यामुळे सीतेला रानात सोडून दिले जाते. तिथे वनदेवता आणि त्यानंतर एका ऋषींच्या आश्रयात ती लहानाची मोठी होते.

फोटो स्रोत, Getty Images
"सीता मोठी झाल्यावर, जे कोणी एका जुन्या धनुष्याला उचलतील त्यांच्याशीच तिचा विवाह होईल, असा निर्णय ते ऋषी जाहीर करतात. सीता ही आपलीच सख्खी मुलगी आहे याची कल्पना नसलेला रावणही तिथे पोहोचतो; पण धनुष्य उचलण्यात तो अपयशी ठरतो. शेवटी फ्रा लाम हे धनुष्य उचलून जिंकतात आणि त्यामुळे सीतेचा विवाह फ्रा लाम यांच्याशी लावून दिला जातो," अशी कथा 'द फ्रा लक फ्रा लाम' सांगते.
या महाकाव्यानुसार रावण हा दिसायला सुंदर, अतिशय बुद्धिमान, बौद्ध तत्त्वज्ञानाचा मोठा जाणकार आणि विलक्षण दैवी शक्ती असलेला दाखवला गेला आहे.
चीन आणि जपानमध्येही रामायणासारख्या अनेक लोककथा प्रचलित आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर 'बोंतेनकोकू' या जपानी कथेतील तमवाका (नायक) हा एक उत्कृष्ट बासरी वाजवणारा कलाकार दाखवला आहे. बारमोन राजाच्या (रावणासारखे पात्र) तावडीतून तो हिमेगिनीला सोडवून आणतो. मात्र यासाठी कसलेही महायुद्ध किंवा मोठा संघर्ष घडल्याचे यात दाखवले गेलेले नाही.
या कथेनुसार, राजा शिकारीसाठी बाहेर पडलेला असतो त्या वेळेचा फायदा घेऊन नायक बासरीच्या सुरांनी सुरक्षारक्षकांना भुरळ पाडतो किंवा त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवतो आणि अखेर नायिकेला तिथून सोडवून नेतो.
'रावण- श्रीलंकेचा सर्वात श्रेष्ठ राजा'
रावणाची रूपे आणि वर्णने वेगवेगळी असली तरी रामायणाच्या बहुतेक सर्वच आवृत्त्यांमध्ये एक साम्य नक्कीच दिसते ते म्हणजे रावण हा 'लंका-पुरी' किंवा श्रीलंकेवर राज्य करणारा राजा होता.
श्रीलंका आणि रावण यांच्यातील हा संबंध आधुनिक काळातही कायम आहे.
![[फोटो कॅप्शन: श्रीलंकेच्या नुवरा एलिया येथील सीता अम्मन मंदिरात रामायणातील दृश्ये रेखाटलेली चित्रे]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/47a3/live/cc1fa840-da58-11f1-93e1-3b657b665bcf.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
"श्रीलंकेतही वाल्मिकी रामायण किंवा कंब रामायणच प्रचलित आहे. मात्र श्रीलंका या देशाने घडवलेला सर्वात महान सुपुत्र म्हणून रावणाचा गौरव केला जातो. श्रीलंकेचा अत्यंत श्रेष्ठ राजा म्हणून त्याला मानले जाते," असा उल्लेख 'रावणाची विविध रूपे: एक अभ्यास' या लेखात आढळतो.
"रामायणात दाखवला गेला तसा रावण वाईट किंवा दुष्ट राजा नव्हता, असे मानणारा सिंहली लोकांचा एक वर्ग श्रीलंकेत आहे. रावणाने त्याकाळी एक प्रगत आणि आधुनिक शासन व्यवस्था चालवली होती, यावर या सिंहली लोकांचा विश्वास आहे," असे श्रीलंकेच्या पत्रकार आणि संपादिका दुशानी नाणयक्कार स्पष्ट करतात.
![[फोटो कॅप्शन: श्रीलंकेच्या पत्रकार व संपादिका दुशानी नाणयक्कार ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/5635/live/2b3fc4e0-da59-11f1-b441-2b33b063138f.jpg.webp)
"परकीय आक्रमणांच्या वेळी आपल्या देशाचे स्वतंत्र अस्तित्त्व आणि ओळख टिकवून ठेवणारा राजा म्हणूनही त्याच्याकडे पाहिले जाते. आजही भारतात दसरा सणाच्या वेळी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.
मात्र सिंहली लोकांपैकी एक वर्ग रामाकडे एक परकीय शक्ती म्हणूनच पाहतो. रावण हा स्थानिक सार्वभौमत्वासाठी आणि श्रीलंकेच्या हक्कासाठी लढलेला राजा म्हणूनच पाहिला जातो," असेही त्या पुढे सांगतात.
भारतात केली जाणारी रावणाची पूजा
भारतातील अनेक मंदिरांत रावणाची पूजा होते. त्यातही उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधल्या बिसरख गावाचे लोक तर दसरा अजिबात साजरा करत नाहीत. उलट ते रावणाला आपले पूर्वज मानून त्याची मनोभावे भक्ती करतात.
दुसरीकडे तामिळनाडूत रामाला जसे भक्तिभावाने पूजले जाते. तसेच रावणाला मानण्याचीही एक रीत आहे. पण तामिळनाडूमध्ये रावणाला मोठे मानण्यामागील कारणे मात्र पूर्णपणे वेगळी आहेत.
द्रविड चळवळीतील प्राध्यापक पुलवर कुलंदै यांनी लिहिलेल्या 'रावण काव्यम' या ग्रंथात, 'रावण तामिळनाडूवर राज्य करत होता' असा उल्लेख आहे. या ग्रंथानुसार, रावण हाच नायक असून राम हे त्याच्या विरुद्धचे पात्र आहे.
सीतेला, 'तुझा पती आल्यावर मी त्याची समजूत काढेन आणि तुला त्याच्याकडे सुपूर्द करेन, तू मुळीच भिऊ नकोस' असा धीर देऊन रावणाने तिला आपल्या बहिणीच्या स्थानी मानून तिचा आदर केला", असे या ग्रंथात सांगितले आहे.
यात रावणाचा अंत हा 'एका असुराचा किंवा वाईट शक्तीचा विनाश' असा नसून, 'तमिळांवर ओढवलेले मोठे संकट आणि दुःखद घटना' म्हणून दाखवला आहे. मोठा वाद निर्माण करणाऱ्या या ग्रंथावर तमिळनाडू सरकारने 2 जून 1948 रोजी बंदी लादली होती. पुढे 1972 मध्ये जाऊन ही बंदी मागे घेण्यात आली.
![[फोटो कॅप्शन: भारतातील बऱ्याच भागांत दसऱ्याला रावणाचे पुतळे जाळले जातात.]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/0c3a/live/30ce0a70-da59-11f1-a701-fddedf244c16.jpg.webp)
फोटो स्रोत, Getty Images
तामिळनाडूत रावणाला एका आदरणीय नायकाच्या रूपात उभे करण्यात द्रविड चळवळीची मोठी भूमिका राहिली आहे, असे लेखक स्टॅलिन राजांगम नमूद करतात.
तरीसुद्धा रावणाला केवळ रामाचा विरोधक म्हणूनच प्रस्थापित केले गेले. याचा अर्थ असा की, रावण हा राक्षस किंवा असूर होता ही संकल्पना एका प्रकारे अप्रत्यक्षपणे स्वीकारूनच ही प्रतिमा उभी केली गेली. परंतु द्रविड चळवळीपूर्वी तामिळनाडूत रावण हा बौद्ध राजा असल्याच्या दृष्टीनेही चर्चा सुरू होत्या. मात्र नंतरच्या काळात या मांडणीला फारसा जोर मिळाला नाही," असे ते स्पष्ट करतात.
"1880 च्या सुमारास 'मद्रास सेक्युलर सोसायटी'ने (चेन्नई लौकिक संघ) काढलेल्या 'तत्वविवेचिनी' मासिकात याबद्दलचे उल्लेख सापडतात," असे त्यांनी नमूद केले.
रामायणाशी संबंधित वेगवेगळ्या महाकाव्यांमध्ये रावणाकडे नेहमीच एक अत्यंत रंजक आणि लक्षवेधी व्यक्तिरेखा म्हणून पाहिले गेले आहे.
"कोण आहे रावण?
रावण कोण आहे? उत्तर भारतात दरवर्षी दहन केला जाणारा एक असुर, श्रीलंकेतील एक आदरणीय राजा आणि तामिळनाडूतील द्रविड राजकारणाच्या प्रतीकांपैकी एक.
मग अशा वेळी रावण नक्की कोण होता याबद्दल कोणत्याही एका निष्कर्षावर पोहोचता येईल का?" असा प्रश्न 'रावणाची विविध रूपे: एक अभ्यास' या लेखात उपस्थित केला आहे.
यावर रावणाच्या दृष्टिकोनातून रामायणाची कथा सांगणारे आनंद नीलकंठन यांचे 'असुर: टेल ऑफ द व्हँक्विशड' हे पुस्तक एक उत्तर देते.
![[ फोटो कॅप्शन: आनंद नीलकंठन लिखित 'असुर: टेल ऑफ द व्हँक्विशड' ]](https://ichef.bbci.co.uk/ace/ws/640/cpsprodpb/084e/live/36a45580-da59-11f1-93e1-3b657b665bcf.jpg.webp)
फोटो स्रोत, Leadstart Publishing Pvt Ltd
ज्याचा स्वतःच्या अतृप्त इच्छांवर कसलाही ताबा नव्हता, पण जीवन पूर्णपणे कवेत घेऊन त्याचा परिपूर्ण आनंद अनुभवण्याची तीव्र ओढ ज्याच्यात होती, अशा माणसाचे प्रतीक म्हणूनच आपल्या महाकाव्यांमध्ये रावणाला दहा तोंडं असलेला दशमुखी दाखवले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























