'दोन गोळ्या घेऊन काम करते, जित्राबं जगवायची आहेत', दुष्काळामुळं अशी वाढतेय ऊसतोड कामगारांची संख्या

दुष्काळ
    • Author, प्राची प्रतिभा शिरीष
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

तोकड्या फळीवजा शिडीवरुन 6 महिन्यांची गरोदर बाई डोक्यावर ऊसाची मोळी घेऊन चालत चालली होती. ती होती शेवंताबाईंची सून.

जळगाव जवळच्या यावलच्या शेवंताबाई त्यांच्या सुनेसह कुटुंबातल्या आठ जणांना घेऊन ऊसतोड करण्यासाठी आल्या आहेत. ऊसतोड कामगार म्हणून काम करण्याचं त्यांचं हे पहिलंच वर्ष आहे.

त्यांचं गाव मध्यप्रदेशच्या हद्दीजवळचं त्यामुळं तोडकं मोडकं मराठी बोलत त्या इतरांशी संवाद साधतात. गावाकडं शेत आहे. पण यंदा काहीच न पिकल्यानं इकडे यायची वेळ आल्याचं त्या सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "पाऊस नाही, यंदा काही पिकलंच नाही. म्हणून इकडे आलो ऊस तोडायला. जमीन आहे पण लहान लहान मुलं आहेत ती काय खाणार? हा प्रश्न आहे. यंदा पाऊसच नाही आला."

शेवंताबाई जळगावच्या, पण सोलापूर जिल्ह्यातल्या माळशीरस तालुक्यातल्या शिंगोर्णी गावच्या उज्ज्वला साठेसुद्धा भर उन्हात ऊसतोड करताना दिसतात.

त्या सांगतात, "रोज दोन गोळ्या घेऊन काम करायला येते. उन्हाने घामाच्या धारा लागतात. आज जरा बरं आहे."

त्यांच्यासाठीही सुद्धा ऊसतोड करण्यासाठी येण्याची ही पहिलीच वेळ.

ऊस

शेवंताबाईंकडे शेत आहे तर उज्वला साठेंकडे पशूधन. साठेंना पशूधनासाठी चारा हवा आहे तर शेवंताबाईंना घरातल्या माणसांना कसं जगवायचं हा प्रश्न. यासाठी दोघीही सवयीचं नसलेलं काम करत आहेत.

दुष्काळाचं भयाण रुप आणि परिस्थिती लोकांवर काय वेळ आणतेय हे सांगणारी ही फक्त दोन उदाहरणं.

दुपारच्या टळटळीत उन्हात उभं रहाणंही अवघड व्हावं अशा परिसरात ऊसाचं नुकसान होण्याआधी त्याची तोड व्हावी यासाठी शेतकरी धडपडत आहेत.

पाणी जास्त लागत असलं तरी ओसाड माळरान वाटावं अशा परिसरात हे उसाचंच पीक तग धरून उभं राहिलेलं दिसतं.

ओसाड पडलेली गावं!

दुष्काळाची तीव्रता अशी की जवळपास प्रत्येकालाच कामासाठी बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही. ज्या गावातून उज्वला साठे येतात ते शिंगोर्णी गाव ओस पडलेलं दिसतं.

एखाद दुसरा अपवाद वगळला तर जवळपास प्रत्येक शेतात जळलेली पिकं काढणीची वाट पहात असल्यासारखी कशी बशी उभी.

यामुळंच दुपारच्या टळटळीत उन्हात गावातले लोक इतरांच्या शेतात राबत आहेत. यातल्या कोणालाच ऊसतोड करण्याची मुळात सवय नाही.

ऊस

पन्नाशीतल्या दादा गळवेंची ऊसतोडीसाठी येण्याची ही पहिलीच वेळ. ते सांगतात, "कोयता हाताला लागतो. पण ऊस तोडला की जित्राबांना वाडं निघतं. त्यामुळे सकाळी यायचं आणि दिवस मावळताना घरी जायचं"

तर थेट मध्यप्रदेशच्या बॉर्डर वरून पहिल्यांदाच ऊसतोड करण्यासाठी आलेला नवरसिंग सांगतो, "पाणी पाऊस झालाच नाही म्हणून इकडं आलो. शेती आहे पण काही झालंच नाही म्हणून मजबूरी इकडं आलो कामाला".

कष्ट तेवढेच मोबदला वेगळा

नव्याने आलेल्या लोकांपैकी बहुतांश पुरुष ऊस तोडतात तर महिला त्याचं वाडं काढून मोळ्या बांधतात. सकाळी सहालाच बहुतांश लोकांचा दिवस सुरू होतो. जवळ राहणारे मुकादमाच्या गाडीतून शेतात येतात तर बाहेरगावचे लोक राहूट्या बांधून शेताजवळच मुक्काम करताना दिसतात.

शेतात पोहोचलं की ऊसतोड करायला सुरुवात होते. तोडून मोळ्या बांधून झाल्या की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला एक फळी वजा शिडी बांधली जाते. त्यावरून आधार घेत महिला डोक्यावर मोळ्यांचं ओझं उचलत वर जातात.

मोळी ट्रॉलीत टाकली की शेजारी बांधलेल्या दोराला धरून खाली उतरतात. कोणत्याही क्षणी थोडा जरी तोल गेला तरी लागण्याची शक्यता असल्याचं त्या सांगतात.

ऊस

बीबीसी मराठीशी बोलताना लक्ष्मी साठे म्हणाल्या, " थोडा जरी तोल गेला तरी पाय मोडण्याची भीती. अवघड आहे हे काम करणं. पण मुलांचं शिक्षण आणि जनावरांना जगवणं यामुळे करावं लागतंय."

हे सगळेच जण पूर्वी शेतमजूर म्हणून काम करणारे. शेतमजूरीत शिंगोर्णीच्या परिसरात सकाळी सात ते दुपारी बारा पर्यंत काम केलं तर महिलांना तीनशे तर पुरुषांना चारशे ते पाचशे रुपयांचा मोबदला मिळतो. इथे मात्र ते गणित बदलतं.

इथे कामाची वेळ साधारण बारा तासांची असल्याचं मुकादम दिनेश अवताडे सांगतात. पण या लोकांना काम जमत नसल्यामुळं तोड कमी होते आणि मोबदल्याचं गणितही बदलत असल्याचं ते मांडतात.

यंदा नव्याने येणाऱ्या लोकांमध्ये दहा टक्के वाढ दिसत असल्याचं सांगत अवताडे म्हणाले, "पूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडलाय. एमपी साईड किंवा जळगाव साईडचं पण लेबर आहे. आणि स्थानिक सुद्धा प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त आहे.

आता पाण्याचा प्रश्न आहे ना जास्त. त्यांना उस नाही ना जास्त तुटत. मग त्यांचे हजेरीचा विचार केला तर दिवसाची त्यांना 200 रूपये सुद्धा मजूरी पडत नाही. 12-13 तास काम करून."

रोजगार हमी?

एकीकडे ही परिस्थिती तर दुसरीकडे ऊसाला पाणी मिळालं नाही तर रिकव्हरी कमी होईल म्हणून आपल्या शेतात लवकर तोड केली जावी यासाठी धडपडणारा शेतकरी अशी स्थिती यंदा बहुतांश भागात दिसतेय.

त्यामुळे कारखानेही लवकर सुरू झाले आहेत. पुढचे तीन चार महिने कारखाने सुरु राहतील असा अंदाज आहे. तो पर्यंत उसतोड हा हक्काचा रोजगार. पण पुढे काय हा प्रश्न या सगळ्यांसमोरच आ वासून उभा आहे.

पुढचे तीन महिने ऊसतोड करण्याचं काम पुरेल. यामुळे त्यानंतर सरकार कडून व्हीबीजीरामजी योजनेअंतर्गत कामं सुरू केली जाणार असल्याचं साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

ऊस

ते म्हणाले, "खरीपामध्ये पेरणी शंभर टक्के झालेली आहे. त्यामुळे पेरणी झाली नाही अशी परिस्थिती नाही. उत्पादकतेमधे घट आहे हे निश्चित आहे. रब्बी मध्ये अद्यापही चांगला पाऊस नसल्यामुळे पेरणीचं प्रमाण कमी राहणार आहे. परंतू ज्या ठिकाणी ओलिताची सोय आहे त्या ठिकाणी पेरणी होईल.

जिल्ह्यामध्ये जवळपास सव्वा लाख हेक्टरच्या आसपास ऊस आहे. सगळे कारखाने आत्ता सुरू झालेले नाहीत मात्र लवकरच सगळे कारखाने सुरू होतील. मात्र जिल्ह्यामध्ये ऊस तोड कामगारांना काम पुढचे तीन साडेतीन महिने मिळणार आहे.

त्यानंतर कामासाठी कोणाला बाहेर जावं लागू नये यासाठी व्हीबीजीरामजी योजने अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कामं मंजूर केलेली आहेत. कोणी कामं मागितली तर गावातच काम मिळेल या पद्धतीने कामं आहेत."

ऊस

पुढच्या वर्षी सूपर एल निनो चे परिणाम जाणवतील अशी शक्यता गृहीत धरून आखणी केल्याचं प्रशासन सांगतं.

यासाठी जी राम जी अंतर्गत जलसंधारणाची कामं केली जाणार आहेत. रोजगाराची हमी दिली जाईल असं सरकार सांगतंय. लोक मात्र जगण्यासाठी बाहेर पडण्याची तयारी आतापासूनच करत आहेत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.