प्रदूषित हवेमुळे फुफ्फुसांवरच नाही, तर हृदय आणि मेंदूवरही होतात 'हे' परिणाम

फोटो स्रोत, Getty Images
- Author, षण्मुखा प्रिया सेल्वराज
- Role, बीबीसी तमीळ
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
हवेचं प्रदूषण ही केवळ पर्यावरणाशी संबंधित समस्या नाही. त्याचा आपल्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत असतो.
प्रदूषणामुळं हवेची गुणवत्ता खराब झाली तर त्याचा परिणाम फुफ्फुसं, हृदय आणि मेंदूसह शरीरातल्या इतर अवयवांवरही होऊ शकतो. फुफ्फुसं आणि हृदयाला प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास होतो.
प्रदूषणातले पीएम 2.5 हे कण इतके सूक्ष्म असतात की, ते नाक आणि श्वसनमार्गाच्या वरच्या भागातील नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला चुकवून फुफ्फुसांमधील वायुकोशांपर्यंत पोहोचू शकतात.
हे अतिसूक्ष्म कण आणि त्यांच्यामध्ये असलेले रासायनिक घटक रक्तात मिसळून शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम करू शकतात. प्रदूषणाच्या या परिणामांबद्दल फुफ्फुसविकारतज्ज्ञ मालविका यांनी नेमकं काय सांगितलं?
वायू प्रदूषणाचे फुफ्फुसं, हृदय आणि मेंदूवर होणारे परिणाम
फुफ्फुसांचं नुकसान : वायु प्रदुषणामुळे श्वसनमार्गाला तीव्र सूज येऊ शकते. त्यामुळे श्वसनमार्गाचे स्नायू आकुंचन पावणे (ब्रॉन्कोस्पॅझम), श्वास घ्यायला त्रास होणं, श्वास घेताना घरघर असा त्रास होऊ शकतो.
आधीपासूनच दमा किंवा क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) असलेल्या व्यक्तींमध्ये या आजारांची तीव्रता वाढू शकते.

फोटो स्रोत, Dr. Malavika
हृदयावर होणारा परिणाम : हृदयाच्या ठोक्यांचा वेग तसंच रक्तदाब यांमध्ये बदल होऊ शकतात. रक्तवाहिन्यांना सूज येऊ शकते. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (ऑक्सिडीकरणामुळे निर्माण होणारा ताण) वाढू शकतो. त्याचप्रमाणे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा धोकाही वाढू शकतो.
मेंदूचं होणारं नुकसान : तीव्र वायु प्रदूषणाच्या संपर्कात आल्यामुळे रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड होऊ शकतो. त्यामुळे पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका वाढू शकतो.
वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासाची तत्काळ दिसणारी लक्षणं
वायू प्रदुषणाचा पहिला आणि थेट परिणाम हा आपल्या श्वसनसंस्थेवर होत असल्याचं मालविका सांगतात.
त्याचबरोबर वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासाची इतर लक्षणं खालीलप्रमाणे दिसतात-
- डोळ्यांची जळजळ
- घशात खवखव, सूज
- प्रदीर्घकाळ राहणारा खोकला
- दडपण आल्यासारखं वाटणं
- श्वास घेताना शिट्टीसारखा आवाज येणं
- धाप लागणं
- डोकेदुखी

फोटो स्रोत, Getty Images
"आधीपासून दमा असलेल्या व्यक्तींना अचानक दम्याचा झटका येऊ शकतो. क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) असलेल्या व्यक्तींमध्ये खोकला, कफ आणि श्वास घ्यायला त्रास होण्याचं प्रमाण वाढू शकते," असं डॉ. मालविका सांगतात.
दीर्घकाळ प्रदूषित हवेमध्ये राहिल्यामुळे काय होतं?
श्वसनविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी एक वायू प्रदूषण. विशेषतः पीएम 2.5 या सूक्ष्म कणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिलं तर फुफ्फुसाच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो, असं फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. मालविका सांगतात.
दमा असलेल्या व्यक्ती : वायू प्रदुषणामुळे श्वसनमार्गातील सूज वाढू शकते. त्यामुळे दम्याचे झटके वारंवार येऊ शकतात. आधीपासून असलेला दमा नियंत्रणात ठेवणंही कठीण होऊ शकतं.
क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) असलेल्या व्यक्ती : वायुप्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने या आजाराची तीव्रता हळूहळू वाढू शकते. विशेषतः धूम्रपान, बायोमास इंधनाच्या धुराचा संपर्क आणि कामाच्या ठिकाणी धुळीच्या संपर्कात येणं या घटकांमुळे हा धोका जास्त असतो.
आधीपासून COPD असलेल्या व्यक्तींमध्ये आजाराची तीव्रता वाढू शकते आणि रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं.

फोटो स्रोत, PTI
फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका : प्रदूषित हवेतले पीएम 2.5 हे सूक्ष्म कण फुफ्फुसांच्या कर्करोगासाठीचं महत्त्वाचं कारण ठरू शकतात. धूम्रपान हा घटकच फुफ्फुसांच्या कर्करोगाला कारणीभूत ठरत नाही. वायू प्रदूषणामुळेही कर्करोगाचा धोका वाढतो.
हृदय व रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार : वायू प्रदूषणाचा परिणाम केवळ फुफ्फुसांवरच नव्हे, तर हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो. दीर्घकाळ प्रदूषित हवेत राहिल्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा (स्ट्रोक) धोका वाढू शकतो.
"एखादी व्यक्ती सतत वायुप्रदूषणाच्या संपर्कात राहत असेल, तर तिला दीर्घकाळ टिकणारा खोकला आणि कफ, व्यायाम किंवा शारीरिक श्रम करताना लवकर थकवा जाणवतो. वारंवार श्वसनमार्गाला संसर्ग होऊ शकतो. दम्यावर नियंत्रण ठेवणं कठीण जाणं आणि हळूहळू श्वास घेण्यास अधिक त्रास होणे अशी लक्षणेही दिसू शकतात," असं डॉ. मालविका सांगतात.
थोडा काळ प्रदूषणात राहिलं तरी फुफ्फुसांचं कायमस्वरुपी नुकसान होऊ शकतं?
"याबद्दल निश्चितपणे सांगता येत नाही. बहुतांश लोकांमध्ये फुफ्फुसांना येणारी सौम्य सूज आणि जळजळ तात्पुरती असते. वायू प्रदुषणाशी संपर्क थांबल्यानंतर त्याचे परिणाम कमी होण्याची शक्यता असते. मात्र, आधीपासूनच फुफ्फुसांचे आजार असलेल्या व्यक्तींच्या फुफ्फुसांचे गंभीर आणि कायमस्वरूपी नुकसान होण्याचा धोका असतो," असा इशारा डॉ. मालविका देतात.
प्रदूषणामुळे फुफ्फुसांचं झालेलं नुकसान पूर्णपणे भरून येऊ शकतं?
आपल्या फुफ्फुसांमध्ये काही प्रमाणात स्वतःला ठीक करण्याची क्षमता असते. वायू प्रदुषणाच्या संपर्कामुळे निर्माण झालेली सौम्य सूज, जळजळ आणि श्वसनमार्गाचे तात्पुरते आकुंचन (ब्रॉन्कोस्पॅझम) हे ठीक होऊ शकतं. प्रदूषित हवेशी संपर्क कमी झाला, तर सुधारणा जाणवू शकते.
मात्र, फुफ्फुसांचं नुकसान कितपत भरून येऊ शकतं, हे प्रामुख्याने तीन गोष्टींवर अवलंबून असतं-
- वायू प्रदुषणाची पातळी किती होती?
- तुम्ही किती काळ प्रदूषणाच्या संपर्कात होते?
- आधीपासून दमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) किंवा हृदयविकार यांसारखे आजार आहेत का?
फुफ्फुसं पूर्ववत व्हायला किती वेळ लागतो?
डॉ. मालविका यांच्या मते, फुफ्फुसांचा दाह सौम्य स्वरूपाचा असेल, तर ती सहसा पूर्ववत होऊ शकते.
"श्वसनमार्गाला आलेली तात्पुरती सूजही अनेकदा कमी होऊ शकते. दम्याच्या रुग्णांमध्ये आजाराची तीव्रता अचानक वाढल्यास योग्य उपचारांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते."
"मात्र, फुफ्फुसांचं गंभीर नुकसान झालं असेल किंवा फुफ्फुसांच्या ऊतींवर व्रण (फायब्रोसिस) उमटले असतील, तर त्यामुळे दीर्घकालीन नुकसान होऊ शकतं," असं फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. मालविका सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
वायू प्रदुषणाचा त्रास झालेल्या व्यक्तींवर कोणते उपचार केले जातात?
वायू प्रदुषणामुळे होणाऱ्या परिणामांवर रुग्णाची लक्षणं आणि आजाराची तीव्रता यानुसार उपचार केले जातात.
- श्वसनमार्ग अरुंद झाल्यास ब्रॉन्कोडायलेटर (श्वसनमार्ग रुंद करणारी औषधे) दिली जाऊ शकतात.
- रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास ऑक्सिजन थेरपी दिली जाऊ शकते.
- आजाराची तीव्रता वाढल्यास (एक्झॅसर्बेशन) त्यानुसार योग्य उपचार केले जातात.
- शारीरिक हालचाली किंवा व्यायाम करताना सतत त्रास होत असल्यास पल्मोनरी रिहॅबिलिटेशन (फुफ्फुसांचे कार्य सुधारण्यासाठी दिले जाणारे पुनर्वसन उपचार) दिले जाऊ शकतात.
यासोबतच हृदयाशी संबंधित काही समस्या निर्माण झाल्या असल्यास त्यावरही योग्य उपचार केले जातात.
महत्त्वाचं म्हणजे केवळ प्रदूषणाच्या संपर्कात आलो म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून अँटिबायोटिक्स, स्टेरॉइड्स, नेब्युलायझेशन यांसारखे सर्व उपचार घेण्याची गरज नसते. रुग्णाची लक्षणं आणि वैद्यकीय तपासण्यांचे निष्कर्ष यांनुसार आवश्यक तेवढेच उपचार घेणं पुरेसं असतं.
कोणती लक्षणं दिसल्यास तातडीने हॉस्पिटलमध्ये जावं?
प्रदूषित हवेच्या संपर्कात आल्यानंतर जर खालील लक्षणं दिसली, तर तातडीनं रुग्णालयात जायला हवं.
- श्वास घ्यायला अडचण येणं
- पूर्ण वाक्य बोलताही येणार नाही इतकी धाप लागणं
- छातीत दुखणं
- चक्कर येऊन बेशुद्ध पडणं किंवा शुद्ध हरपणं.
- श्वास घेताना घरघर लागणं
- डॉक्टरांनी आधीच दिलेली औषधे घेऊनही लक्षणांमध्ये सुधारणा न होणं
- रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होणं
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)
























