'मी पत्नीशी प्रतारणा केली', एनव्हीडियाच्या CEO ने कथित चिनी गुप्तहेरासोबतचे संबंध स्वीकारले; संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी एनव्हीडियाने (Nvidia) कंपनीचे सीईओ जेन्सेन हुआंग यांची चौकशी सुरू केली आहे. हुआंग यांचे संबंध असलेली चिनी महिला गुप्तहेर असल्याच्या बातम्यांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कंपनीची गोपनीय माहिती किंवा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित बाबींविषयी कोणतीही तडजोड झाली असल्याचं मान्य करण्याचं कारण सध्या कंपनीच्या संचालक मंडळासमोर नसल्याचंही एनव्हीडियानं म्हटलं आहे.
याबाबत न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, जेन्सेन हुआंग यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या अॅलिस हुआंग या चिनी व्यावसायिक महिला बीजिंगसाठी हेरगिरी करत असल्याचं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांमधील अधिकाऱ्यांचं मत आहे.
दरम्यान, जेन्सेन हुआंग यांनीही या नात्याबद्दल माहिती देत, पत्नीशी प्रतारणा केल्याची कबुली दिली आहे. तसंच, आपल्या पत्नीला आणि मुलांना दुखावल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली.
एनव्हीडिया ही जगातील आघाडीची टेक कंपनी असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानासाठी आवश्यक असलेल्या हॉर्डवेअर उत्पादनाबाबत कंपनीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
जेन्सेन हुआंग कंपनीचं नेतृत्व करत राहणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. तर, या प्रकरणाचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असं बीबीसीच्या टेक्नॉलॉजी आणि एआय संपादक झो क्लाइनमन यांनी म्हटलं आहे.
ट्रम्प यांचं म्हणणं काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, तपास सुरू झाल्याची बातमी समोर आल्यापासून त्यांनी एनव्हिडियाच्या (Nvidia) प्रमुखांशी कोणतीही चर्चा केलेली नाही.
ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितलं की, "मला एवढंच माहीत आहे की ते एक चांगले माणूस आहेत, पण पडद्यामागे नक्की काय चाललं आहे, हे सांगता येत नाही."

फोटो स्रोत, Anna Moneymaker/Getty Images
त्यांनी पुढं असंही म्हटलं की, हुआंग यांनी "आपल्या देशासाठी अतिशय उत्तम काम केलं आहे."
रविवारी पत्रकारांनी ट्रम्प यांना विचारलं की, त्यांना आता असं वाटतं का की, त्या वेळी मिळालेल्या गुप्तचर माहितीच्या आधारे त्यांनी काही पावलं उचलायला हवी होती.
यावर ट्रम्प यांनी उत्तर दिलं की, "नाही, मला तसं वाटत नाही. माझ्या मते, ती एक आदरणीय व्यक्ती आहे."
चीननं यापूर्वी एनव्हिडियाच्या (Nvidia) प्रमुखाला लक्ष्य करून हेरगिरीची मोहीम राबवल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, अशा दाव्यांना "आधारहीन तर्क" असंही संबोधलं आहे.
चीनने फेटाळले वृत्त
दरम्यान, हुआंग यांना लक्ष्य करून हेरगिरीचे कारस्थान रचले जात असल्याच्या आरोपांचं चीननं आधीच खंडन केलं आहे.
न्यूयॉर्क टाइम्सने गेल्या महिन्यात यासंदर्भातल्या आरोपांचं वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी यावर प्रतिक्रिया दिली होती.
"संबंधित वृत्त निराधार आहे. चीनची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे त्यात काहीही तथ्य नाह," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
संशयित हेर कोण आहेत?
न्यूयॉर्क टाइम्सनं गेल्या महिन्यात प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, Nvidia चे प्रमुख जेन्सेन हुआंग यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या अॅलिस हुआंग चीनसाठी हेरगिरी करत होत्या, असा संशय अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांमधील अधिकाऱ्यांना आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणा या चिनी व्यावसायिक महिलेवर नजर ठेवून होत्या, अशी माहिती या वृत्तामध्ये अज्ञात सूत्रांच्या हवाल्यानं देण्यात आली होती. त्यानंतर अॅलिस बीजिंगसाठी काम करत असल्याचा निष्कर्षही काढण्यात आला होता. अॅलिस हुआंग आणि जेनसन हुआंग यांच्यात कोणतेही कौटुंबिक नाते नाही.

फोटो स्रोत, Getty Images
संशयित हेर आणि एका अमेरिकन नागरिकामधील संवाद गुप्तचर यंत्रणांच्या निगराणीत आला होता. त्यानंतर 'अनमास्किंग' (Unmasking) या प्रक्रियेद्वारे हा अमेरिकन नागरिक Nvidia चे प्रमुख जेन्सेन हुआंग असल्याचं स्पष्ट झालं असं वृत्त आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनं या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यासाठी अॅलिस हुआंग यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांनी वृत्तपत्राच्या प्रश्नांना कोणतेही उत्तर दिलेले नाही.
अॅलिस हुआंग सिंगापूरमधील 'मेगास्पीड' (Megaspeed) या डेटा सेंटर कंपनीशी संबंधित आहेत. या आरोपांकडे गांभीर्यानं पाहत असल्याचं कंपनीनं गेल्या महिन्यात न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं होतं. तसंच या प्रकरणाची अंतर्गत चौकशी करण्यासाठी बाह्य कायदेशीर सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघर्ष करून मिळवले यश
जेन्सेन हुआंग यांनी 1993 मध्ये Nvidia (एनव्हीडिया) या कंपनीची स्थापना केली होती. हा शब्द खरं तर दोन शब्दांचं संयोजन आहे. NV म्हणजे 'नेक्स्ट व्हिजन' आणि Vid या शब्दाचा अर्थ व्हीडिओ आहे.
हुआंग यांचं जीवन कष्ट, धोके आणि कठोर परिश्रमाने भरलेलं आहे. ही कंपनी सुरू करण्यासाठी त्यांनी रेस्टॉरंटमधील स्वच्छतागृहे आणि टेबल साफ करण्यापासून बरीच कामं केली आहेत.
1963 मध्ये जन्मलेल्या हुआंग यांचं बालपण तैवान आणि थायलंडमध्ये गेलं. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना आणि त्यांच्या भावाला अमेरिकेला पाठवायचं ठरवलं.
दोन्ही भावांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या घरी पाठवण्यात आलं. ते नातेवाईक फार पूर्वीपासून अमेरिकेत स्थायिक झाले होते. दोघांनी केंटकी येथील ओनिडा बॅप्टिस्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतलं.
2016 मध्ये शाळेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्रानुसार, दोन्ही भावांना तिथे राहण्याची, खाण्याची आणि काम करण्याची परवानगी होती. या संस्थेत फक्त उच्च शिक्षण दिलं जातं.
लहानपणी हुआंग शौचालय साफ करायचं काम करत.
हुआंग यांनी 2012 साली दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "अनेक अडचणी असूनही, मी नेहमी आनंदी असायचो त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव होता."

फोटो स्रोत, Getty Images
हुआंग आणि त्यांची पत्नी लोरी यांनी 2016 मध्ये शाळेतील मुलींसाठी वर्गखोल्या आणि वसतिगृहांसह इमारत बांधण्यासाठी 2 दशलक्ष डॉलरची देणगी दिली होती.
काही वर्षांनी त्यांचे आई-वडीलही अमेरिकेतील ओरेगॉनमध्ये स्थायिक झाले. नंतर ते आई-वडिलांसोबत राहत होते. हुआंगने ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतलं.
त्यांच्या मते, तेव्हाच त्यांना संगणकाची भुरळ पडली. तिथेच त्याची पत्नी लोरीशी भेट झाली. दोघेही एकत्र काम करायचे. 80 विद्यार्थ्यांच्या वर्गात फक्त तीन मुली शिकत होत्या. लोरी त्यांच्यापैकी एक होत्या.
विद्यापीठातील 2013 च्या व्याख्यानात, हुआंग यांनी कंपनीचे सह-संस्थापक ख्रिस मालाचोव्स्की आणि कर्टिस प्रिम यांना योगायोगाने कसे भेटले याबद्दल सांगितलं.
कॅलिफोर्नियातील सॅन जोस येथील डेनीसच्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करताना एनव्हीडियाच्या तीन सह-संस्थापकांना कंपनीची कल्पना सुचली.
वयाच्या 15 व्या वर्षी पोर्टलँडमधील डेनिसच्या रेस्टॉरंटमध्ये भांडी धुणे, टेबल साफ करणे आणि वेटर म्हणून काम करणे ही पहिली नोकरी मिळाल्यापासून हुआंगचे डेनिसशी चांगले संबंध होते.
"हे एक मोठं काम होतं. प्रत्येकाने रेस्टॉरंट व्यवसायात त्यांची पहिली नोकरी केली पाहिजे. यामुळे आपल्या अंगी नम्रता येते आणि कठोर परिश्रम कसे असतात ते समजतं," असं हुआंग सांगतात.
स्टॅनफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेस येथे नुकत्याच झालेल्या व्याख्यानात त्यांनी सांगितलं होतं की, "मी सीईओ होण्यापूर्वी माझं पहिलं काम भांडी धुण्याचं होतं आणि मी त्यात खूप चांगला होतो."
त्यांच्या मते, रेस्टॉरंटच्या नोकरीमुळे त्यांना त्यांच्या लाजाळूपणावर काम करण्यास मदत झाली.
त्यांनी न्यूयॉर्क टाईम्सशी बोलताना सांगितलं होतं की, "मला लोकांशी बोलताना खूप अवघडायचं."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























